पलूस-कडेगावची विभागणी ‘घाटमाथ्या’वरून

By Admin | Updated: September 17, 2014 23:03 IST2014-09-17T22:55:39+5:302014-09-17T23:03:59+5:30

पलूस-कडेगावची विभागणी ‘घाटमाथ्या’वरून

Palus-Keeling Division is divided by 'Ghatmathiya' | पलूस-कडेगावची विभागणी ‘घाटमाथ्या’वरून

पलूस-कडेगावची विभागणी ‘घाटमाथ्या’वरून

प्रताप महाडिक - कडेगाव -कायम दुष्काळी म्हणून ओळखला जाणारा व सध्या ताकारी व टेंभू योजनांच्या माध्यमातून सधन झालेला कडेगाव तालुका तसेच कृष्णाकाठचा पलूस तालुका अशा दोन तालुक्यांचा समावेश असलेला कडेगाव-पलूस विधानसभा मतदारसंघ आहे. पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघाचे पूर्वीचे नाव भिलवडी-वांगी असे होते. १९७८ च्या निवडणुकीपूर्वी खानापूर तालुक्यातील काही गावे आणि तासगाव तालुक्यातील काही गावे मिळून भिलवडी-वांगी विधानसभा मतदारसंघाची निर्मिती झाली. या मतदारसंघाला ९ निवडणुकांचा इतिहास आहे. यापैकी १९७८ आणि १९८० अशा दोन निवडणुकात पलूस तालुक्यातील संपतराव चव्हाण यांना आमदारकी मिळाली, तर १९९५ च्या निवडणुकीत कडेगाव तालुक्यातील संपतराव देशमुख यांना आणि १९९६ च्या पोटनिवडणुकीत पृथ्वीराज देशमुख यांना आमदारकी मिळाली. उर्वरित १९८५, १९९०, १९९९, २००४ आणि २००९ अशा तब्बल पाच निवडणुका जिंकून कडेगाव तालुक्यातील डॉ. पतंगराव कदम यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले.
२००९ च्या पुनर्रचनेत पलूस तालुक्यातील आंधळी, मोराळे आणि बांबवडे या तीन गावांचा समावेश या मतदारसंघात झाला. अन्य सर्व गावे जुन्या भिलवडी-वांगी मतदारसंघातीलच आहेत. कायम दुष्काळी कडेगाव तालुक्यातील शेतकरी मुरमाड व कोरडवाहू शेतजमिनीत काबाडकष्ट करून वाटचाल करीत होते. याशिवाय वसगडे, भिलवडी परिसरात क्षारपड जमिनीचा प्रश्न आहे. अशा भौगोलिक परिस्थितीशी झुंज देणारा हा मतदार राजकीयदृष्ट्या अतिशय संवेदनशील मानला जातो.
भिलवडी-वांगी विधानसभा मतदारसंघाच्या निर्मितीनंतर पहिली निवडणूक झाली, ती १९७८ मध्ये काँग्रेसचे संपतराव चव्हाण आणि शेकापचे क्रांतिअग्रणी जी. डी. (बापू) लाड यांच्यात ही निवडणूक झाली. या निवडणुकीत चव्हाण यांनी लाड यांचा २२ हजार ३२२ मताधिक्याने पराभव केला. ही निवडणूक वगळली, तर या मतदारसंघातील सर्व आठही निवडणुका कदम यांनी लढविल्या आहेत. पाच निवडणुकांमध्ये पतंगरावांचा विजय झाला, तर तीन निवडणुकांमध्ये त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. १९८० च्या निवडणुकीत पतंगरावांनी बंडखोरी केली. पण, केवळ ८६ मतांनी त्यांचा पराभव झाला. १९८५ च्या निवडणुकीत कदम यांचा ३० हजार १३५ मतांनी विजय झाला. १९९५ च्या निवडणुकीत अपक्ष संपतराव देशमुख यांनी कदम यांचा ७ हजार २६५ मतांनी पराभव केला. या निवडणुकीचा अपवाद वगळता आजपर्यंत कदम यांचे या मतदारसंघावर वर्चस्व आहे.

आरोप-प्रत्यारोपांच्या फै री झडणार
आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे पतंगराव कदम व महायुतीच्या वाटेवर असलेले पृथ्वीराज देशमुख यांच्यातच कडवा राजकीय सत्तासंघर्ष पहावयास मिळणार आहे. यामुळे या निवडणुकीत आरोप-प्रत्योपांच्या फै री झडणार आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संदीप राजोबाही इच्छुक आहेत.

कडेगाव तालुक्यात एक लाख २५ हजार ४४८, तर पलूस तालुक्यात एक लाख २६ हजार २१२, असे एकूण दोन लाख ५१ हजार ६०७ मतदार कडेगाव-पलूस तालुक्याचा आमदार ठरविणार आहेत. दोन्ही तालुक्यात समान मतदान असल्यामुळे प्रचाराचा जोरही दोन्हीकडे समांतर असणार आहे.

Web Title: Palus-Keeling Division is divided by 'Ghatmathiya'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.