फोटो - शिराळा पश्चिम भागात रोपलागणीस तयार असलेली शेते.
सहदेव खोत
लोकमत न्यूज नेटवर्क
पुनवत : शिराळा पश्चिम भागात गेल्या आठवड्यापासून पावसाने उघडीप दिली आहे. पोषक वातावरण नसल्याने शिराळा पश्चिम भागात चिखलगुठ्ठा पद्धतीने केल्या जाणाऱ्या भात रोपलागणी लांबणीवर पडल्या आहेत.
शिराळा तालुक्यात भाताची लागवड पेरणी, टोकण व रोपलागण पद्धतीने केली आहे. बहुतांश शेतकरी मेच्या अखेरीस धुळवाफ पेरणी करतात. याच दरम्यान काही शेतकरी टोकण पध्दतीने भाताची लागवड करतात तर पश्चिम भागातील शेतकरी भाताचा तरवा करून चिखलगुठ्ठा पद्धतीने पावसातच रोपलागण करतात.
आठ दिवसांपूर्वी शिराळा तालुक्यात धुवाॅंधार पाऊस झाला. पेरणी केलेले पीक उगवूनही आले. मात्र, त्यानंतर पावसाने तालुक्यात पाठ फिरवली आहे. चिखलगुठ्ठा पध्दतीने रोपलागण करण्यासाठी पावसाची अत्यंत आवश्यकता असते. वाफ्यात पाणी साचले की त्यात मशागत करून रोपलागण केली जाते. सध्या रोपलागण करण्यायोग्य पाऊस नाही. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. शिराळा पश्चिम भागातील शेतकरी रोपलागणीसाठी पुरेशा पावसाच्या प्रतीक्षेत आहे. काही शेतकऱ्यांनी विहीर, ओढ्याचे पाणी शेतात घालून रोपलागणीला सुरुवात केली आहे.
चौकट -
रोपलागणीचा फायदा
शेतात चिखलगुठ्ठा करून रोपलागण केल्यास उत्पन्न वाढण्यास मदत होते. तसेच आंतरमशागत करावी लागत नाही. शेतकऱ्यांची मेहनतही वाचते परिणामी पश्चिम भागातील शेतकरी भात रोपलागणीला पसंती देतात.