पतसंस्थांनी पॅकेज बुडविले!
By Admin | Updated: July 27, 2014 00:31 IST2014-07-27T00:30:11+5:302014-07-27T00:31:19+5:30
पाच कोटींची थकबाकी : पतसंस्था, संचालकांच्या मालमत्तेवर बोजा चढविण्यास सुरुवात

पतसंस्थांनी पॅकेज बुडविले!
सदानंद औंधे /मिरज
ठेवपरतीसाठी शासनाचे पॅकेज घेऊन परतफेड न करणाऱ्या पतसंस्थेवर व संचालकांच्या मालमत्तेवर कार्जाचा बोजा चढविण्याची कार्यवाही सुरु झाली आहे. मिरज तालुक्यातील २४ पतसंस्थांना दिलेल्या ५ कोटी ३० लाख अर्थसहाय्यापैकी केवळ ४५ लाख वसूल झाले आहेत. दोन थकबाकीदार पतसंस्थांच्या मालमत्तेवर बोजा चढविण्यात आला आहे.
पाच वर्षापूर्वी आर्थिक अडचणीत येऊन बंद पडलेल्या पतसंस्थांतील ठेवीदारांच्या ठेवी अंशत: परत देण्यासाठी शासनाने बिनव्याजी अर्थसहाय्याची घोषणा केली. जिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली पतसंस्थांना पॅकेजचे वाटप करण्यात आले. आर्थिकदृष्ट्या अडचणीत आल्याचा दावा करणाऱ्या पतसंस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी पॅकेज घेतले; मात्र परतफेड केलेली नाही. शासनाच्या अर्थसहाय्यातून प्रत्येक ठेवीदाराला १० हजाराची रक्कम देण्यात आली. शासनाकडून मिळालेले बिनव्याजी अर्थसहाय्य थकित कर्जाची वसुली करुन परतफेड करण्याची अट होती. मात्र पतसंस्था बुडविणाऱ्यांनी गेल्या चार वर्षात शासनाच्या कर्जाची परतफेड केलेली नाही. यामुळे बिनव्याजी अर्थसहाय्याच्या वसुलीसाठी संबंधित पतसंस्थांच्या इमारतीवर व पदाधिकाऱ्यांच्या मालमत्तेवर बोजा चढविण्याचा आदेश सहकार विभागाने दिला आहे.
प्रशासक असलेल्या पतसंस्थेच्या मालकीची मालमत्ता नाही व संचालक मंडळही अस्तित्वात नाही अशा पतसंस्थेच्या कर्जदारांच्या तारण मालमत्तेवर बोजा चढविण्यात येणार आहे.
मिरज तालुक्यात २४ पतसंस्थांना ५ कोटी ३० लाख रुपये अर्थसहाय्य देण्यात आले होते. त्यापैकी केवळ चार पतसंस्थांनी २५ लाख रुपये परतफेड केली आहे. अद्याप ४ कोटी ८४ लाख रुपये थकबाकी असल्याने संबंधितांच्या मालमत्तेवर बोजा चढविण्याची कार्यवाही सुरु झाली आहे. ८ लाख थकबाकीपोटी मिरजेतील विठ्ठल नागरी पतसंस्था व १९ लाख रुपये थकबाकीपोटी तुंग येथील हनुमान ग्रामीण बिगरशेती पतसंस्थेच्या इमारतीवर कर्जाचा बोजा नोंद करण्यात आला आहे.
उर्वरित थकबाकीदार पतसंस्थांच्या इमारतीवर व संस्था संचालकांच्या मालमत्तेवर बोजा नोंद करण्याची कार्यवाही सुरु असल्याची माहिती तालुका उपनिबंधक मनोहर माळी यांनी दिली.