स्टेरॉईड, सीटी स्कॅनचा अतिमारा ठरेल कोरोना रुग्णांना घातक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:28 IST2021-05-07T04:28:10+5:302021-05-07T04:28:10+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह येण्यापूर्वीच तसेच पॉझिटिव्ह आल्यानंतर अनेकांना सीटी स्कॅनचा सल्ला दिला जात ...

स्टेरॉईड, सीटी स्कॅनचा अतिमारा ठरेल कोरोना रुग्णांना घातक
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह येण्यापूर्वीच तसेच पॉझिटिव्ह आल्यानंतर अनेकांना सीटी स्कॅनचा सल्ला दिला जात आहे. सीटी स्कॅनसह स्टेरॉईडचा अतिमारा कोरोना रुग्णांना घातक ठरू शकतो, अशी भीती वैद्यकीय तज्ज्ञांकडून वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे स्टेरॉईड, सीटी स्कॅनचा अनावश्यक वापर टाळण्याचे आवाहनही आरोग्य विभागाने केले आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही जिल्ह्यात चिंताजनक परिस्थिती आहे. दररोज १५०० ते १८०० नवे रुग्ण आढळत आहेत. कोरोना विषाणूचा संसर्ग नेमका किती प्रमाणात झाला, हे तपासण्यासाठी विविध प्रकारच्या चाचण्या केल्या जातात. यामध्ये प्रामुख्याने सीटी स्कॅनचा समावेश असून, त्याचा अतिमारा कोरोना रुग्णांना घातक ठरण्याची भीती वर्तवली जात आहे. कोरोनाच्या धास्तीने वारंवार सीटी स्कॅन करणाऱ्या बाधितांना आरोग्य विभागाने धोक्याचा इशारा दिला आहे. एकदा सीटी स्कॅन करणे १०० ते २०० वेळा छातीची क्ष-किरण तपासणी करण्यासारखे असून, त्यामुळे भविष्यात कर्करोग होण्याचा धोका उद्भवतो, असे सांगत आरोग्य विभागाने सावधगिरीचा इशाराही दिला.
दररोज चारशेवर सीटी स्कॅन
जिल्ह्यात ४५ डायग्नोस्टिक सेंटर आहेत. त्यापैकी सांगलीतच ११ सेंटर्स आहेत. दररोज १५००हून अधिक बाधित आढळत आहेत. दररोज सहा ते साडेसहा हजार तपासण्या केल्या जात आहेत. यातील सीटी स्कॅन करणाऱ्यांची संख्या ४००हून अधिक असते. आरटीपीसीआरला थोडा विलंब लागत असल्याने तासाभरात अहवाल मिळतो म्हणून तातडीने उपचारासाठी सीटी स्कॅनचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो.
चौकट
एक सीटी स्कॅन म्हणजे १०० ते २०० एक्स-रे
एक सीटी स्कॅन करणे १०० ते २००वेळा छातीची क्ष-किरण तपासणी करण्यासारखे असून, याचे विपरीत परिणामही संबंधितांना भोगावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ज्या बाधितांची ऑक्सिजन पातळी कमी आहे, ज्यांच्यात लक्षणे तीव्र आहेत, अशा रुग्णांनाच ‘सिटी स्कॅन’चा सल्ला देणे योग्य ठरते, असे मत वैद्यकीय क्षेत्रातून व्यक्त होत आहे.
चौकट
स्टेरॉईडचे दुष्परिणाम काय आहेत
स्टेरॉईड हा एक रासायनिक पदार्थ आहे, ज्याचा वापर एखाद्या विशेष आजाराच्या उपचारावेळी केला जातो. मांसपेशीचा विकास करण्यासाठी याचा वापर केला जात असला, तरी त्याचे काही दुष्परिणामही आहेत. त्याने खोकला, सर्दी अशा समस्या सतत होण्याचा धोका असतो. सीटी स्कॅन, स्टेरॉईडचा अतिवापर करणे शक्यतो टाळावे, असा सल्ला आरोग्य विभागाने दिला.
कोट
डायग्नोस्टिक यंत्रणा या उपचारासाठी सहाय्यभूत असतात. त्यामुळे त्याचा योग्यवेळी वापर करावा लागतो. ज्यांना लक्षणे दिसत नाहीत किंवा सौम्य लक्षणे आहेत, अशांबाबत साध्या चाचण्या घेऊन निदान करता येऊ शकते. पण वैद्यकीय तज्ज्ञांकडून अशा चाचण्यांचा किंवा स्टेरॉईडचा अतिमारा होण्याची शक्यता कमी असते.
- डॉ. रवींद्र ताटे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी, महापालिका