महाडिक गट वरचढ, नाईक-देशमुख गटास धक्का
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2020 19:35 IST2020-01-10T19:33:00+5:302020-01-10T19:35:39+5:30
कानामागून आला आणि तिखट झाला असे वाळवा-शिराळ्यातील भाजपमध्ये झाले आहे. विधानसभा निवडणुकीत सम्राट महाडिक यांची बंडखोरी भाजपच्या पराभवाला कारणीभूत ठरली असताना, भाजपने राहुल आणि सम्राट महाडिक यांना भाजपमध्ये सन्मानाने घेतले आणि जिल्हा परिषदेत महाडिक गटाच्या सदस्याला बांधकाम सभापतीपद दिले. त्यामुळे माजी आमदार शिवाजीराव नाईक आणि सत्यजित देशमुख गट नाराज झाल्याची चर्चा आहे.

महाडिक गट वरचढ, नाईक-देशमुख गटास धक्का
अशोक पाटील
इस्लामपूर : कानामागून आला आणि तिखट झाला असे वाळवा-शिराळ्यातील भाजपमध्ये झाले आहे. विधानसभा निवडणुकीत सम्राट महाडिक यांची बंडखोरी भाजपच्या पराभवाला कारणीभूत ठरली असताना, भाजपने राहुल आणि सम्राट महाडिक यांना भाजपमध्ये सन्मानाने घेतले आणि जिल्हा परिषदेत महाडिक गटाच्या सदस्याला बांधकाम सभापतीपद दिले. त्यामुळे माजी आमदार शिवाजीराव नाईक आणि सत्यजित देशमुख गट नाराज झाल्याची चर्चा आहे.
विधानसभा निवडणुकीत शिराळा मतदारसंघात माजी आमदार शिवाजीराव नाईक आणि सत्यजित देशमुख गट भाजपच्या झेंड्याखाली एकत्र आले, तेव्हा राष्ट्रवादीचा पराजय, असे समीकरण बनले होते. मात्र सम्राट महाडिक यांची बंडखोरी राष्ट्रवादीच्या पथ्थ्यावर पडली. आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पेठनाक्यावरील महाडिक गटाचे राहुल आणि सम्राट महाडिक यांना भाजपमध्ये सन्मानाने प्रवेश मिळाला.
एकीकडे सत्यजित देशमुख यांना आमदारपदाची आॅफर देऊन भाजपचे तत्कालीन आमदार शिवाजीराव नाईक यांची ताकद वाढविण्याची खेळी भाजपने केली, मात्र सम्राट महाडिक यांना उमेदवारी देण्याचे आश्वासन पाळले नाही. त्यामुळे महाडिक यांची बंडखोरी भाजपवरच उलटली. चंद्रकांत पाटील यांनी तिन्ही गटांना आमदारपदाचे दाखविलेले गाजर भोवले.
इस्लामपूर मतदार संघात आमदार सदाभाऊ खोत, महाडिक युवा शक्ती, हुतात्मा संकुलाचे वैभव व गौरव नायकवडी, नगराध्यक्ष निशिकांत पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंदराव पवार, भीमराव माने, आष्टा पालिकेतील वैभव शिंदे यांना चंद्रकांत पाटील यांनी दिलेल्या आश्वासनांमुळे हे गट एकत्र आलेच नाहीत. त्यामुळे इस्लामपूर मतदार संघात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा विजय सुकर झाला.