हेल्मेटअभावी महाराष्ट्रात गेले ५ हजारांवर बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:39 IST2020-12-13T04:39:41+5:302020-12-13T04:39:41+5:30
मालिका भाग १ अविनाश कोळी लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : जिवाला कवडीमोल ठरवित बेफिकीरीच्या वाटेने जाणाऱ्या लोकांच्या गर्दीत हेल्मट ...

हेल्मेटअभावी महाराष्ट्रात गेले ५ हजारांवर बळी
मालिका भाग १
अविनाश कोळी
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : जिवाला कवडीमोल ठरवित बेफिकीरीच्या वाटेने जाणाऱ्या लोकांच्या गर्दीत हेल्मट व सिटबेल्टविना महाराष्ट्रात दरवर्षी ७ हजारांवर लोक मृत्युमुखी पडत आहेत. देशातील एकूण अपघाती मृत्यूमध्ये सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रातील आहेत. त्यामुळे राज्यातील अपघातांची स्थिती गंभीर बनली आहे.
महाराष्ट्र हायवे पोलिसांनी नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार २०१९ मध्ये राज्यातील हेल्मेट न घातल्यामुळे एकूण ५ हजार ३२८ लोकांचा जीव गेला. हेल्मेट नसल्याने गंभीर जखमी झालेल्या लोकांची संख्या ६ हजार ४२७ इतकी आहे. दरवर्षी अशाप्रकारच्या अपघातात लोकांच्या बळींचे व गंभीर दुखापत होण्याचे प्रमाण अधिक आहे. २०१८ ची तुलना करता हेल्मेटविना जीव गेलेल्या लोकांची संख्या २०१९ मध्ये वाढली आहे. राज्यातील एकूण अपघाती मृत्यूचा विचार केल्यास जवळपास १० टक्के अपघात हे सुरक्षासाधनांचा वापर न केल्याने झाले आहेत. हेल्मेट न घातलेल्या चालकामुळे जवळपास १ हजार ६४६ सहप्रवाशांचा मृत्यू झाला, तर ३ हजार ६८२ चालक ठार झाले आहेत.
सिटबेल्ट न घातलेले ८१९ चालक, तर ८७६ सहप्रवासी ठार झाले आहेत. म्हणजेच चारचाकी चालकांपेक्षाही त्यातील सहप्रवासी अधिक ठार झाल्याची बाब समोर आली आहे. म्हणजेच आता अशा बेफिकीर चालकावर प्रवाशांनीही तितकीच बंधने आणणे गरजेचे आहे.
चौकटी
सुरक्षासाधनांविना अपघाताचे तुलनात्मक आकडे
हेल्मटविना
वर्ष ठार गंभीर जखमी
२०१८ ५२५२ ६४२६
२०१९ ५३२८ ६४२७
सिटबेल्टविना
२०१८ १६५६ २९२१
२०१९ १६९७ २७२०
चौकट
हेल्मेट नसल्याने झालेले अपघात
परिणाम टक्के
ठार ३६
गंभीर जखमी ४४
किरकोळ जखमी २०
चाैकट
वाहनांची संख्या
राज्यात २०१९ च्या आकडेवारीनुसार साडेतीन कोटी वाहने असून, त्यात २.४१ कोटी केवळ दुचाकी असून, एलएमव्ही प्रकारातील वाहने ४६ लाख ३२ हजार इतकी आहेत. दिवसेंदिवस रस्त्यावरील वाहनांची संख्या वाढत असून, अपघातांचा धोकाही वाढला आहे.
चौकट
कुठे होताहेत अपघात
राज्यातील एकूण अपघातांचा व त्यातील मृत्यूंचा विचार केल्यास ज्याठिकाणी हेल्मेट अत्यंत कमी प्रमाणात घातले जाते, अशा जिल्हा मार्गांवर ४४ टक्के लोक ठार झाले आहेत. राज्य महामार्गांवर २६ टक्के, राष्ट्रीय महामार्गांवर २९ टक्के, तर एक्स्प्रेस हायवेवर १ टक्के लोक मृत्युमुखी पडले.