बोरगावमध्ये चिकुनगुनिया साथीचा जोर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:18 IST2021-06-11T04:18:19+5:302021-06-11T04:18:19+5:30
बोरगाव : बोरगाव कोरोनाचे हाॅटस्पाॅट बनले असताना आता चिकुनगुनियाची साथही जोर धरू लागली आहे. गावात रुग्णांची संख्या अधिक जाणवत ...

बोरगावमध्ये चिकुनगुनिया साथीचा जोर
बोरगाव : बोरगाव कोरोनाचे हाॅटस्पाॅट बनले असताना आता चिकुनगुनियाची साथही जोर धरू लागली आहे. गावात रुग्णांची संख्या अधिक जाणवत असताना आरोग्य विभाग कागदावर केवळ २१ रुग्णच दाखवत आहे. ही बाब गांभीर्याने न घेता आरोग्य विभाग व शासन जनतेची दिशाभूल करत आहे. चिकुनगुनियाबाबत वेळीच ठोस उपाययोजना करा, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.
बोरगाव प्राथमिक आरोग्य केंद्र हे वाळवे तालुक्यातील कोरोनाचे प्रथम क्रमांकाचे केंद्र बनले आहे. त्यातच आता चिकुनगुनियाचे घरोघरी रुग्ण आढळून येत आहेत. गावात कोरोनाने नागरिकांचे कंबरडे मोडले असताना भरीत भर म्हणून या रोगाने शेकडो कुटुंबे संक्रमित झाली आहेत.
अशी परिस्थिती गावात उद्भवली असताना अधिकारी व कर्मचारी मात्र साथ नसल्याचेच भासवत आहेत. रुग्णास ताप डोकेदुखीचा त्रास होऊ लागल्यास कोरोना की साथीचा आजार या विचारानेच रुग्ण भयभीत होत आहेत. आरोग्य केंद्रातील या सावळ्या गोंधळाचा फटका नागरिकांना सहन करावा लागत आहे. या आरोग्य केंद्रात सक्षम व अनुभवी अधिकारी नसल्यानेच शेकडो चिकुनगुनियाचे रुग्ण झाले आहेत. या सर्व बाबींची वरिष्ठ पातळीवरून चौकशी करून निष्काळजी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
कोट
चिकुनगुनियाचे रुग्ण लपवणे ही बाब गंभीर असून, सर्व माहिती घेऊन संबंधितांवर कारवाईचा अहवाल वरिष्ठांना पाठवू व लवकरात लवकर साथ आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करणार आहोत.
डॉ. वैभव नायकवडी, अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी, वाळवा