निकृष्ट शालेय पोषण आहार शिक्षकांनी न घेण्याचे आदेश
By Admin | Updated: December 23, 2014 00:36 IST2014-12-23T00:36:01+5:302014-12-23T00:36:01+5:30
नामदेव माळी : अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर संतप्त प्रतिक्रिया

निकृष्ट शालेय पोषण आहार शिक्षकांनी न घेण्याचे आदेश
मिरज : ठेकेदारांकडून शालेय विद्यार्थ्यांसाठी पुरविण्यात येत असलेल्या निकृष्ट पोषण आहाराबाबत ‘लोकमत’ने उठविलेल्या आवाजाची तालुका प्रशासनाने दखल घेतली. पोषण आहाराच्या निकृष्ट वस्तू ताब्यात घेऊ नयेत, असा आदेश पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी नामदेव माळी यांनी तालुक्यातील शाळांना दिला आहे. दरम्यान, जबाबदारी झटकण्याच्या प्रशासनाच्या भूमिकेवर पुन्हा संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
मिरज तालुक्यात निकृष्ट पोषण आहाराचा पुरवठा करून शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्यावरच घाला घालण्याचे कृत्य सुरू केले आहे. ‘लोकमत’ने याबाबत आवाज उठविताच पालकवर्ग, शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांतून तीव्र प्रतिक्रया उमटल्या. या वृत्ताची मिरज पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी नामदेव माळी यांनी गांभीर्याने दखल घेतली आहे. ठेकेदारांकडून निकृष्ट वस्तूंचा पुरवठा झाल्यास तो ताब्यात घेऊ नये, असा सक्त आदेश त्यांनी तालुक्यातील शाळांना दिला आहे. दरम्यान, प्रशासनाच्या या भूमिकेवर संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. जबाबदारी झटकण्यातील हा प्रकार असल्याचा पालकांतून आरोप होत आहे. वास्तविक पुरवठा होणाऱ्या वस्तू पूर्वीपासूच तपासून घेतल्या जात आहेत. तांदळाचे इलेक्ट्रॉनिक काट्याऐवजी ताणकाट्यावर वजन करण्यात येते. या वजनात मोठी तफावत दिसून येते. कडधान्याचे पाहायचे झाल्यास वरच्या बाजूस चांगला, आतमध्ये किडका, दिसायला चांगला वाटला तरी, तो शिजता शिजत नाही. वस्तूचे वजन आणि दर्जा तपासून घेण्याची जबाबदारी संबंधित बचत गटावर सोपविणे म्हणजे चोर सोडून संन्याशाला फाशी देण्यातील प्रकार आहे. जि. प. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दखल घेऊन आहाराच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. (वार्ताहर)