नेर्ला बल्ब फॅक्टरी जागेच्या लिलावास विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:53 IST2020-12-11T04:53:49+5:302020-12-11T04:53:49+5:30

नेर्ले : येथील महाराष्ट्र विद्युत उपकरणे उत्पादक सहकारी संस्था, नेर्ला बल्ब फॅक्टरीची जागा लिलावाने न विकता बँकेने स्वत: घेऊन ...

Opposing the auction of Nerla bulb factory site | नेर्ला बल्ब फॅक्टरी जागेच्या लिलावास विरोध

नेर्ला बल्ब फॅक्टरी जागेच्या लिलावास विरोध

नेर्ले : येथील महाराष्ट्र विद्युत उपकरणे उत्पादक सहकारी संस्था, नेर्ला बल्ब फॅक्टरीची जागा लिलावाने न विकता बँकेने स्वत: घेऊन ती वापरावी, अशी मागणी संस्थेचे माजी अध्यक्ष अरविंद रणखांबे यांनी कार्यकारी संचालक, जिल्हा मध्यवर्ती बँक, सांगली यांच्याकडे एका लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात म्हटले की, राजारामबापू पाटील व गणपती निवृत्ती रणखांबे यांनी १९६६ रोजी या संस्थेची स्थापना केली. नेर्ला बल्ब म्हणून ही संस्था प्रसिद्ध झाली. तत्कालीन संरक्षण मंत्री यशवंतराव चव्हाण यांनी या संस्थेस मोठी मदत केली. संस्थेमध्ये चाळीस कामगार कार्यरत होते. संस्थेचे सर्व संचालक, सभासद हे शेतकरी आहेत. संस्थेची जागा ग्रामपंचायत अखत्यारितील असून, महसुली अटी व शर्तीची आहे. शासनाकडून नाममात्र रकमेस अटी-शर्तीवर संस्थेने खरेदी केलेली आहे. काळानुसार संस्थेने बदल करण्यासाठी जिल्हा बँकेकडून कर्ज काढले. हे कर्ज काढत असताना जागा तारण दिली नाही. कर्ज थकल्याने बँकेने ही जागा ताब्यात घेऊन त्यावर बँक बोजा बेकायदेशीरपणे चढविला. ही जागा लिलावाने विक्रीचा बँकेचा प्रयत्न असून, ही जागा मोक्याची असल्याने या जागेला एक इतिहास आहे. ग्रामस्थांच्या भावना या जागेच्याबाबतीत संवेदनशील आहेत. जागा विक्रीचा प्रयत्न झाल्यास गावात असंतोष व प्रक्षोभ निर्माण होईल. बँकेने कामगारांची देणी देणे याचा विचार न करता लिलावात काढण्याचा घाट घातला आहे. बँकेचे देणे संस्थेला मान्य असून, जागा न विकता बँकेने ती स्वत: घ्यावी व येथील शाखेला ती वापरण्यास द्यावी, अशी मागणी निवेदनात केली आहे. निवेदनाच्या प्रती पालकमंत्री जयंत पाटील, आ. मानसिंगराव नाईक, जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलीप पाटील, जिल्हाधिकारी व सरपंच ग्रामपंचायत, नेलेॅ यांना पाठवण्यात आल्या आहेत.

Web Title: Opposing the auction of Nerla bulb factory site