चांदोली धरणाचे दरवाजे आज उघडणार
By Admin | Updated: July 29, 2014 22:57 IST2014-07-29T22:24:12+5:302014-07-29T22:57:28+5:30
पुन्हा अतिवृष्टी : नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

चांदोली धरणाचे दरवाजे आज उघडणार
शिराळा/वारणावती : चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर पुन्हा वाढला असून, गेल्या २४ तासांत १३४ मि.मी. पाऊस झाल्याने येथे अतिवृष्टीची नोंद झाली आहे. उद्या, बुधवारी धरणातून अडीच हजार क्युसेक्सने पाणी सोडण्यात येणार असून, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा पाटबंधारे विभागाने दिला आहे.
गेल्या दहा दिवसांत येथे वारंवार अतिवृष्टी होत आहे. दोन दिवसांपूर्वी पावसाने थोडी उघडीप दिली होती; मात्र काल, सोमवारपासून पुन्हा पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे धरणाच्या पाणीपातळीतही वेगाने वाढ होत आहे. धरण सध्या ८५ टक्के भरले असून, सांडवा पातळी ओलांडली आहे. उद्या दुपारी तीन वाजता पाणीपूजन करून धरणाचे दरवाजे उघडण्यात येणार आहेत. २५ सेंटीमीटरने हे दरवाजे उघडले जाणार असून, अडीच हजारांचा विसर्ग असेल, अशी माहिती पाटबंधारे अधिकाऱ्यांनी दिली. पाणी सोडण्यात येणार असल्याने आता वारणेच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. वारणा नदीच्या पाणीपातळीत वाढ होणार असून, नदीकाठच्या गावांनी सतर्क राहावे, असे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.
दरम्यान, पावसाचा जोर वाढल्यामुळे परिसरातील नदी-नाले, ओढे तुडुंब भरून वाहात आहेत. वारणा नदीच्या पाणीपातळीतही मोठी वाढ झाली आहे. आज दुपारी ४ वाजता धरणाची पाणीपातळी ६२१.५0 मीटर, तर पाणीसाठा ८२३.७५ द.ल.घ.मी. (२९.0८ टीएमसी) इतका होता. वीज निर्मिती केंद्रातून १७५८ क्युसेक्स विसर्ग नदीपात्रात होत आहे. (वार्ताहर)