जिल्ह्यातील पशुधनाचे ५० टक्केच लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:32 IST2021-07-07T04:32:32+5:302021-07-07T04:32:32+5:30
सांगली : जिल्ह्यातील सहायक पशुधन अधिकारी, पशुधन पर्यवेक्षकांनी विविध मागण्यांसाठी असहकार आंदोलन सुुरू केले आहे. यामुळे जिल्ह्यातील गायी, म्हैशी ...

जिल्ह्यातील पशुधनाचे ५० टक्केच लसीकरण
सांगली : जिल्ह्यातील सहायक पशुधन अधिकारी, पशुधन पर्यवेक्षकांनी विविध मागण्यांसाठी असहकार आंदोलन सुुरू केले आहे. यामुळे जिल्ह्यातील गायी, म्हैशी आणि शेळ्या-मेंढ्यांचे लसीकरण ठप्प झाले आहे. पावसाळ्यापूर्वी शंभर टक्के पूर्ण करायचे लसीकरण आजअखेर केवळ ५० टक्केच पूर्ण झाले आहे. लसीकरणाकडे अधिकारी आणि लोकप्रतिनिधींचे लक्ष नसल्यामुळे शेतकरी चिंतेत सापडले आहेत.
जिल्ह्यात गायी, म्हैशी आणि शेळ्या-मेंढ्यांसह सर्व पशुधनाची १६ लाख संख्या आहे. यामध्ये आठ लाख शेळ्या-मेंढ्यांची संख्या आहे. या पशुधनाचे मे महिन्यात मान्सूनपूर्वी लसीकरण करावे, असा शासनाचा नियम आहे. पावसाळ्यानंतर तयार होणाऱ्या ओल्या चाऱ्यामुळे गाई, म्हैशींना घटसर्प, फऱ्या आणि शेळ्या, मेंढ्यांना आंत्रविशारद साथीचा फटका बसू शकतो. म्हणून मान्सूनपूर्वी पशुधनाचे लसीकरण होणे अपेक्षित आहे. पण, सहायक पशुधन अधिकारी, पशुधन पर्यवेक्षकांच्या आंदोलनामुळे जिल्ह्यातील पशुधनाचे पावसाळ्यापूर्वी लसीकरणच झाले नाही. मे महिन्यात पूर्ण करायच्या लसीकरणाची सुरुवातच जून महिन्यात झाली आहे. याबाबत जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. किरण पराग यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले की, जिल्ह्यातील सहायक पशुधन अधिकारी, पशुधन पर्यवेक्षकांचे विविध मागण्यांसाठी असहकार आंदोलन सुुरू आहे. यामुळेच लसीकरण करण्यात अडचणी येत आहेत. लसीकरण किती झाले, याचीही माहिती संबंधित अधिकाऱ्यांकडून मिळत नाही. सध्या पूरग्रस्त १२२ गावांमध्ये ८० ते ९० टक्क्यांपर्यंत लसीकरण झाले आहे. उर्वरित ठिकाणी ५० टक्क्यांपर्यंत लसीकरण झाले आहे. शासनाने संबंधित अधिकाऱ्यांच्या मागण्यांबाबत तोडगा काढला, तर लसीकरणाला गती मिळण्यास मदत होणार आहे.