सांगली : जिल्ह्यात दर पाच दिवसाला एक खून होत असल्याचे भयानक चित्र दिसून येते. सहा महिन्यांत तब्बल ३९ खून झाले आहेत. त्यामध्ये वैयक्तिक कारणातून ३० खून झाले आहेत. इतर ९ खून गुन्हेगारीच्या वर्चस्वातून झाल्याचे दिसून येते. पोलिसांनी या सर्व खुनांचा छडा लावला असला तरी खुनाचे वाढते प्रमाण चिंताजनक आहे. कुपवाड, इस्लामपूर परिसरात खुनाचे प्रकार वाढले आहेत.जिल्ह्यात गतवर्षीच्या तुलनेत इतर गुन्ह्यांचे प्रमाण घटले आहे. परंतु दुसरीकडे खुनाचे प्रमाण मात्र वाढल्याचे चित्र चिंताजनक म्हणावे लागेल. गुन्हेगारी वर्चस्व, दोन टोळ्यांमधील वाद, खुनाचा बदला यातून खून वाढले नाहीत. परंतु वैयक्तिक कारणातून होणारे खून वाढले आहेत. गुन्हेगारी वर्चस्वातून खून होण्याचे प्रमाण कमी असले तरी एकंदरीत पाच दिवसाला एक खून होतोय म्हटल्यावर हे प्रमाण चिंताजनकच आहे.
गुन्हेगारी टोळ्यांना लगाम घालून संभाव्य गुन्ह्यांना आळा घालता येतो. परंतु वैयक्तिक कारणातून होणारे खून टाळणे पोलिसांच्या हातात राहिले नाही. तरीही जमिनीचा वाद, आर्थिक वाद, कौटुंबिक वाद यातून होणारे खून टाळण्यासाठी उपाययोजना करण्याची जबाबदारी पोलिस, जिल्हा प्रशासन यांच्यावर राहते.
जमिनीच्या वादातून किंवा गावपातळीवर इतर कारणातून होणारे वाद स्थानिक पातळीवर वेळीच मिटवले गेले तर संभाव्य गंभीर गुन्हे टाळता येतात. त्यासाठीच पोलिस पाटील यांची मदत घेऊन तंटामुक्त समित्यांसमोर गावातील वाद मिटवण्यासाठी पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी पुढाकार घेतला आहे. गावातील किरकोळ तंटा, वादातून गंभीर गुन्हे घडू नयेत, दिवाणी खटल्यातून फौजदारी गुन्हा घडणार नाही याची दक्षता घेतली जाणार आहे.किरकोळ आणि क्षुल्लक कारणातून खून होत असल्यामुळे ते रोखण्याची जबाबदारी संपूर्ण समाजाची आहे. अल्पवयीन मुलांकडून होणारे खून हा समाजाच्या चिंतेचा विषय आहे. पालकांनी आपल्या पाल्यांकडे लक्ष देण्याची गरज आहे. कळत, नकळत गुन्हेगारीकडे वळणारी पावले वेळीच थांबवली पाहिजेत.
कोयत्याचा सर्रास वापरशेती कामासाठी होणारा कोयत्याचा वापर अलीकडे खून करण्यासाठी होऊ लागला आहे. कोयता विक्रीवर नियंत्रण ठेवणे अवघड आहे. त्यामुळे सहजपणे कोयता मिळतो. पोलिसांकडून आर्म ॲक्टचे गुन्हे दाखल केले जात असूनही कोयत्याचा वापर थांबलेला नाही. जवळपास ८० ते ९० टक्के खुनाच्या गुन्ह्यात कोयता वापरला जातो.
खुनाची वेगवेगळी कारणेकौटुंबिक वाद, चारित्र्यावर संशय, अनैतिक संबंध, आर्थिक वाद आणि पूर्ववैमनस्यातून खुनाच्या घटना घडत आहेत. ३९ पैकी ३० खून वैयक्तिक कारणातून झाले आहेत. इतर खून पूर्ववैमनस्य, खुनाचा बदला, क्षणिक वाद, दारूच्या नशेतील वाद यातून झाले आहेत.
अल्पवयीन गुन्हेगारी धोकादायकजिल्ह्यात झालेल्या अनेक खुनांमध्ये अल्पवयीन मुलांचा सहभाग दिसून आला आहे. क्षणिक राग, सहनशक्ती नसणे, संयमाचा अभाव, विचार करण्याची क्षमता गमावणे आणि वाईट संगत यामुळे अनेक अल्पवयीन मुले गुन्हेगारी कृत्य करतात असे दिसून येते. काही गुन्हेगार अल्पवयीन मुलांचा गुन्हेगारीसाठीही वापर करतात.
जिल्ह्यात इतर गंभीर गुन्ह्याचे प्रमाण गतवर्षीच्या तुलनेत घटले आहे. परंतु खुनाच्या घटना वाढल्या आहेत. त्यामध्ये वैयक्तिक कारणातून खून होण्याचे प्रमाण अधिक आहे. गाव पातळीवरील वाद, तंटे मिटवण्यासाठी पोलिस पाटील यांची मदत घेतली जाणार आहे. तंटामुक्त समित्या सक्षम करण्याचा प्रयत्न सुरू आहे. -संदीप घुगे, पोलिस अधीक्षक, सांगली.