वसगडे येथे शेततळ्यात बुडून एकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:29 IST2021-05-07T04:29:33+5:302021-05-07T04:29:33+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क भिलवडी : वसगडे (ता. पलूस) येथील सहदेव बाळकृष्ण सुतार (वय ४०) यांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाला. ...

वसगडे येथे शेततळ्यात बुडून एकाचा मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
भिलवडी : वसगडे (ता. पलूस) येथील सहदेव बाळकृष्ण सुतार (वय ४०) यांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारस घडली. भिलवडी पोलीस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे.
सहदेव सुतार यांचा मुलगा प्रेम उर्फ प्रतीक सुतार (वय १०) हा पोहायला शिकण्यासाठी जुनी येळावी वाट वसगडे येथील रावसाहेब पाटील यांच्या शेतातील शेततळ्याकडे गेला होता. येथे सहदेव सुतार यांचा मित्र किरण चव्हाण हे प्रेमला पोहायला शिकवित होते. या वेळी सहदेव सुतार हे काठावर बसले होते.
पोहताना प्रेमला भीती वाटल्याने त्याने किरण यांच्या गळ्याला मिठी मारली. तलाव पूर्ण भरला असल्याने किरण प्रेमला घेऊन पोहत काठाच्या दिशेने आले. या वेळी काठावर बसलेल्या सहदेव सुतार यांनी प्रेमला धीर देण्यासाठी हात पुढे केला. मात्र पाय घसरून ते पाण्यात बुडाले. सहदेव यांना पोहता येत नसल्याने ते बुडू लागले. किरण यांनी प्रेमला काठावर सोडून पुन्हा सहदेव यांना वाचविण्याचा प्रयत्न केला; पण तोपर्यंत सहदेव यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही माहिती किरण यांनी परिसरातील शेतकऱ्यांना दिली. सर्वांनी मिळून सहदेव यांचा मृतदेह पाण्याबाहेर काढला.
याबाबत भिलवडी पोलीस ठाण्यात वर्दी देण्यात आली असून, पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. सहदेव सुतार यांची उत्तम फर्निचर कारागीर म्हणून ओळख होती. त्यांच्या अकाली जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.