सांगली जिल्ह्यातील पावणेदोन लाख लाडक्या बहिणींचे दीड हजार रोखले
By अशोक डोंबाळे | Updated: September 1, 2025 19:30 IST2025-09-01T19:30:07+5:302025-09-01T19:30:31+5:30
पडताळणीत माहिती उघड : कुटुंबात दोनपेक्षा जास्त लाडक्या बहिणी घेत आहेत योजनेचा लाभ

संग्रहित छाया
अशोक डोंबाळे
सांगली : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत जिल्ह्यातील सात लाख ३५ हजार ९४४ लाभार्थी होते. यापैकी एक लाख ७० हजार ७२९ लाडक्या बहिणींना शासकीय नोकरी, चारचाकी वाहन, कुटुंबांत दोनपेक्षा जास्त लाभार्थीं अशा विविध कारणांमुळे अपात्र ठरविले आहे. या सर्व लाडक्या बहिणींचे लाभ रद्द होणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यासाठी महिन्याला येणारे २५ कोटी ६० लाख ९३ हजार ५०० रुपये बंद झाले आहेत.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे जिल्ह्यात सात लाख ३५ हजार ९४४ लाडक्या बहिणी लाभ घेत आहेत. या बहिणींना महिना दीड हजार रुपयांचा लाभ देण्याचा निर्णय शासनाने घेतल्यानंतर जिल्ह्यात त्याला चांगला प्रतिसाद मिळाला; पण यादरम्यान बोगस लाभार्थ्यांनी योजनेत सहभागी होत पैसा लाटल्याचा आरोप झाल्यानंतर शासनाने अशा लाडक्या बहिणींचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात ७८ हजार ४७८ लाडक्या बहिणी योजनेस अपात्र ठरविण्यात आल्या होत्या.
त्यानंतर शासकीय नोकरीत असणाऱ्या १० महिला कर्मचाऱ्यांचा लाभ शासनाने बंद केला आहे. तिसऱ्या टप्प्यांत अनेक अपात्र लाभार्थी तसेच एकाच कुटुंबातील दोनपेक्षा जास्त लाभार्थी या योजनेचा लाभ घेत असल्याचे माहिती पुढे आले आहे. जिल्ह्यातील सात लाख ३५ हजार ९४४ लाडक्या बहिणींची प्रत्यक्ष त्यांच्या कुटुंबांना भेट देऊन पडताळणी केली जात आहे.
जवळपास ८० टक्के पडताळणीचे काम पूर्ण झाले आहे. त्यात जिल्ह्यातील ७४ हजार ४९४ कुटुंबात दोनपेक्षा जास्त लाभार्थी या योजनेचा लाभ घेत असल्याचे पुढे आले आहे तर २१ ते ६५ वयोगटांतील १४ हजार ७४७ लाभार्थी अपात्र झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील ८९ हजार २४१ लाडक्या बहिणी या योजनेस अपात्र ठरल्या आहेत, असे महिला व बालकल्याण विभागाकडून सांगण्यात आले.
- पहिल्या टप्प्यात लाडक्या बहिणींचे असे लाभ रद्द
- बँकेच्या पासबुकमध्ये डबल नाव : ११६६
- एका प्रोफाइलवरून ५००, १००० पेक्षा जास्त अर्ज भरणे : ५७१९२
- लाभार्थींकडे चारचाकी वाहन : २०१२०
दुसऱ्या टप्प्यात शासकीय नोकरीतील महिलांचा लाभ बंद
जिल्हा परिषदेत सरकारी नोकरीत असतानाही ‘लाडकी बहीण’ योजनेचे हप्ते घेतल्याचे निष्पन्न झाले आहे. अशा १० महिला कर्मचाऱ्यांची यादी जिल्हा परिषदेस प्राप्त झाली आहे. त्यांच्याकडून या पैशांची वसुली केली जाणार आहे. नागरी सेवा कायद्यानुसारही त्यांच्यावर कारवाईचे आदेश महिला व बालविकास विभागाने दिले आहेत.
तिसऱ्या टप्प्यातील अपात्र लाडक्या बहिणी
- २१ ते ६५ पेक्षा वयोगटांतील अपात्र लाभार्थी : १७७४७
- एका कुटुंबात दोनपेक्षा जास्त लाभार्थी : ७४४९४