सांगली आगारांना मिळणाऱ्या १०० बसेस वेटिंगवर, ठेकेदार म्हणतोय..; एसटीचे वेळापत्रक कोलमडले
By अशोक डोंबाळे | Updated: February 4, 2023 18:15 IST2023-02-04T18:15:31+5:302023-02-04T18:15:53+5:30
सांगली आगारात १० वर्षांपेक्षा जास्त वापरलेल्या ३५४ बसेस

सांगली आगारांना मिळणाऱ्या १०० बसेस वेटिंगवर, ठेकेदार म्हणतोय..; एसटीचे वेळापत्रक कोलमडले
सांगली : जिल्ह्यातील एसटीच्या दहा आगारांना ८५० बसेसची गरज असताना सध्या केवळ ७०० बसेस कार्यरत आहेत. खासगी कंपनीकडून फेब्रुवारीमध्ये १०० बसेस मिळणार होत्या; पण त्या तयार नसल्यामुळे ठेकेदारानेही सांगली विभागास मार्चपर्यंत थांबण्याचा सल्ला दिला आहे. कमी बसेसमुळे एसटीचे वेळापत्रक कोलमडले आहे.
राज्य शासनाने एसटी बसेस खासगी कंपनीकडून मागवण्याचा निर्णय घेतला आहे. सांगली विभागाकडे ९०० बसेस होत्या. तेरा वर्षांनंतर त्या कालबाह्य धरून भंगारात विक्री होती. त्यानुसार आतापर्यंत २०० कालबाह्य बसेस टप्प्या-टप्प्याने भंगारात घातल्यामुळे सध्या ७०० बसेस शिल्लक आहेत. यामध्ये १० वर्षांपेक्षा जास्त वापरलेल्या ३५४ बसेस आहेत. सध्या एसटीकडे प्रवाशांची गर्दी असूनही बसेसची टंचाई आहे.
जिल्ह्यातील दहा आगारांसाठी २०० बसेसची मागणी केली होती. एसटी महामंडळाने खासगी ठेकेदाराकडून या बसेस देण्याचे नियोजन केले होते. त्यानुसार पहिल्या टप्प्यामध्ये १०० बसेस दि. १ फेब्रुवारीपर्यंत देण्याचे मान्य करून तसा करार झाला होता; पण नवीन बसेस तयार नसल्यामुळे ठेकेदाराने मार्चपर्यंत थांबावे लागेल, असे उत्तर दिले आहे.
यामुळे एसटीचे प्रवासी वाहतुकीचे वेळापत्रक कोलमडले आहे. ऐन हंगामात हे घडले आहे. प्रवाशांना उन्हाचा पारा सहन करत बसची वाट पाहावी लागत आहे.
नवीन ६० बसेस फेब्रुवारीअखेरीस
एसटीकडे २०० नवीन बसेसची मागणी केली आहे. ठेकेदाराने फेब्रुवारीअखेर ६० नवीन बसेस देण्याचे मान्य केले आहे. उर्वरित बसेस मार्च महिन्यात मिळणार आहेत, अशी माहिती सहायक वाहतूक अधीक्षक विक्रम हांडे यांनी दिली.