विश्वविजेतेपदानंतर बुद्धिबळ पंढरी सांगलीकरांमध्ये नवचैतन्य, संकुलाच्या मागणीला मिळाले ‘बळ’
By घनशाम नवाथे | Updated: December 14, 2024 12:22 IST2024-12-14T12:22:33+5:302024-12-14T12:22:55+5:30
घनशाम नवाथे सांगली : जागतिक बुद्धिबळाच्या पटावर डी. गुकेशने विश्वविजेतेपद पटकावल्यानंतर बुद्धिबळ पंढरी सांगलीत नवचैतन्याचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसून ...

विश्वविजेतेपदानंतर बुद्धिबळ पंढरी सांगलीकरांमध्ये नवचैतन्य, संकुलाच्या मागणीला मिळाले ‘बळ’
घनशाम नवाथे
सांगली : जागतिक बुद्धिबळाच्या पटावर डी. गुकेशने विश्वविजेतेपद पटकावल्यानंतर बुद्धिबळ पंढरी सांगलीत नवचैतन्याचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसून आले. बुद्धिबळाचा इथला वारसा, परंपरा कायम ठेवून जागतिक पटावर सांगलीचा लौकीक कायम ठेवण्यासाठी नवी ‘चाल’ खेळण्याचे बळ मिळाल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. तसेच, बुद्धिबळ संकुलाचे अपूर्ण स्वप्न साकारण्यासाठी आणखी नवी ‘खेळी’ खेळली जाईल, असे दिसून आले.
नाट्यपंढरी सांगलीची बुद्धिबळ पंढरी म्हणून ओळख निर्माण करण्यात नूतन बुद्धिबळाचा सिंहाचा वाटा आहे. १९४२ मध्ये नूतन बुद्धिबळ मंडळाची स्थापना झाली. मंडळाचे संस्थापक तथा बुद्धिबळाचे भीष्माचार्य म्हणून ओळखले जाणारे भाऊसाहेब पडसलगीकर यांनी बुद्धिबळाला वाहून घेतले होते. देशात बुद्धिबळाच्या स्पर्धामधून सांगलीची वेगळी ओळख त्यांनी करून दिली. अनेक खेळाडू या पंढरीत दरवर्षी बुद्धिबळ खेळण्यासाठी येतात. कोरोनाच्या काळात खेळ थांबल्यानंतर सांगलीतून जगभरात सर्वाधिक ऑनलाइन स्पर्धा सांगलीतून घेतल्या गेल्या. जागतिक बुद्धिबळाच्या पटावर सांगलीचे स्थान अधोरेखित झालेले आहे.
बुद्धिबळ संकुल उभारण्याचे पडसलगीकर यांचे स्वप्न अद्याप साकार झालेले नाही. ज्याप्रमाणे हरियाणात कुस्तीसाठी प्रयत्न झाले. त्याचप्रमाणे सांगलीत बुद्धिबळाचे संकुल साकारण्यासाठी बुद्धिबळावर प्रेम करणारी मंडळी प्रयत्नशील आहेत. पडसलगीकर यांच्या पश्चात अनेक मंडळी त्यासाठी पाठपुरावा करत आहेत. आता विश्वविजेतेपद डी. गुकेश याने पटकावल्यानंतर सांगलीमध्ये पुन्हा नवचैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. भाऊसाहेबांचे स्वप्न साकार करण्यासाठी ‘बळ’ मिळाल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली.
सांगलीत जल्लोष
डी. गुकेश याने विश्वविजेतेपद पटकावल्यानंतर सांगलीतील विविध चेस ॲकॅडमी आणि त्यांचे खेळाडू एकत्र आले. त्यांनी जल्लोष केला. पेढे, साखर वाटप करून आनंदोत्सव साजरा केला. शेकडो खेळाडूंना समाज माध्यमावरही आनंद व्यक्त केला.
नाट्यपंढरी सांगलीने बुद्धिबळात पारदर्शकतेतून स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. या खेळाला गतवैभव प्राप्त करण्यासाठी पुन्हा एकदा वातावरण निर्माण झाले आहे. बुद्धिबळ संकुल साकारण्यासाठी अनेक मंडळी सरसावली आहेत. विश्वविजेतेपद भारताला मिळाल्यामुळे खेळाडू, पालक यांच्यातही उत्साहाचे वातावरण आहे. - चिदंबर कोटीभास्कर, उपाध्यक्ष, सांगली जिल्हा बुद्धिबळ संघटना.
कमी वयात डी. गुकेशने विजेतेपद पटकावल्यामुळे नवीन खेळाडूंना याचा निश्चित फायदा होईल. या खेळाकडे करिअर म्हणून बघता येईल. विश्वविजेतेपदामुळे या खेळाकडे अनेकांचा ओढा वाढेल. डी. गुकेश याचे वडील सर्जन आहेत. त्यांनी करिअर बाजूला ठेवून त्याच्या खेळाकडे लक्ष दिले. तर आईने सर्व जबाबदारी पार पाडली. दोघांनी त्याच्या करिअरसाठी वाहून घेतल्यामुळे नवा इतिहास घडला. - विजयकुमार माने, संचालक, केपीएस चेस ॲकॅडमी