मेडिकलच्या विद्यार्थी संख्येला कात्री

By Admin | Updated: September 6, 2015 23:09 IST2015-09-06T23:09:47+5:302015-09-06T23:09:47+5:30

एमबीबीएसवर टांगती तलवार : मिरज महाविद्यालयाच्या दहा जागा कमी

The number of medical students is scissor | मेडिकलच्या विद्यार्थी संख्येला कात्री

मेडिकलच्या विद्यार्थी संख्येला कात्री

मिरज : शैक्षणिक सुविधा अपुऱ्या असल्याने मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील पदव्युत्तर विभागाच्या दहा जागा यावर्षी कमी झाल्या आहेत. पदव्युत्तर शिक्षण घेणारे डॉक्टर्स कमी झाल्याने सांगली-मिरजेतील सिव्हिलमध्ये रुग्णसेवेवर परिणाम होणार आहे. एमबीबीएसच्या दीडशे विद्यार्थ्यांच्या मान्यतेवरही मेडिकल कौन्सिलची टांगती तलवार आहे.
मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे १५० विद्यार्थी व ४५ पदव्युत्तर प्रशिक्षणार्थींच्या जागा होत्या. मात्र महाविद्यालयात अध्यापकांच्या रिक्त जागा, रक्तपेढी, शैक्षणिक सभागृहासह अन्य सुविधा नसल्याने पदव्युत्तर विभागाच्या ४५ पैकी १० जागा चालूवर्षी जूनपासून कमी करण्यात आल्या आहेत. स्त्रीरोग विभाग, शस्त्रक्रिया, बालरोग, अस्थिव्यंग, औषध विज्ञानशास्त्र, फिजिआॅलॉजी या विभागातील दहा जागा कमी झाल्या आहेत. सांगली, मिरज सिव्हिलमध्ये उपचारासाठी दाखल होणाऱ्या सुमारे पाचशे रुग्णांवर पदव्युत्तर शिक्षण घेणारे निवासी डॉक्टर उपचार करतात. मात्र निवासी डॉक्टरांची संख्या कमी झाल्याने सांगली, मिरज सिव्हिलच्या रुग्णसेवेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. पदव्युत्तर पदवी घेणारे विद्यार्थी तीन वर्षे हॉस्पिटलच्या सेवेत असल्याने वरिष्ठ डॉक्टरावरील रुग्णांचा भार कमी होतो. १९६२ मध्ये स्थापन झालेल्या मिरज वैद्यकीय महाविद्यालयात १९८० पासून ५५ पदव्युत्तर जागा होत्या. शैक्षणिक सुविधा अपुऱ्या असल्याने पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ होण्याऐवजी ही संख्या ३५ वर आली आहे. यामुळे पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. खासगी महाविद्यालयातून पदव्युत्तर पदवी व पदविका घेण्यासाठी २५ ते ५० लाख रुपये खर्च येतो. वैद्यकीय महाविद्यालयात अध्यापकांची सुमारे ३० पदे रिक्त आहेत. गतवर्षी मेडिकल कौन्सिल आॅफ इंडियाच्या तपासणीत अध्यापकांची रिक्त पदे, रुग्णालयासाठी रक्तपेढी व अन्य शैक्षणिक सुविधा नसल्याबद्दल आक्षेप घेण्यात आला होता. एका वर्षात सुविधांची पूर्तता करण्याच्या अटीवर एमबीबीएसच्या दीडशे विद्यार्थ्यांना मान्यता देण्यात आली आहे.
पदव्युत्तर विभागातील दहा जागा यावर्षी जूनपासून रद्द करण्यात आल्या आहेत. मात्र अद्याप आवश्यक शैक्षणिक सुविधा उपलब्ध झाल्या नसल्याने मेडिकल कौन्सिल आॅफ इंडियाच्या पुढील तपासणीपर्यंत १५० विद्यार्थ्यांच्या मान्यतेवरही टांगती तलवार असल्याचे चित्र आहे. (वार्ताहर)


सार्वजनिक बांधकामकडून चालढकल
महाविद्यालयातील अध्यापकांच्या रिक्त पदांच्या भरतीसाठी पाठपुरावा सुरू आहे. निधी उपलब्ध असतानाही सार्वजनिक बांधकाम विभागाकडून चालढकल सुरू असल्याने रक्तपेढीच्या बांधकामासाठी विलंब झाला आहे. मात्र रक्तपेढीसह इतर शैक्षणिक सुविधांची पूर्तता करून पदव्युत्तर विभागाच्या जागा पूर्ववत मिळविण्यात येतील, असे अधिष्ठाता डॉ. दीप्ती डोंणगावकर यांनी सांगितले.

Web Title: The number of medical students is scissor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.