मिरज शासकीय रूग्णालयात आयसीयु बेड्सची संख्या वाढविणार - जयंत पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 18:23 IST2021-05-01T18:22:26+5:302021-05-01T18:23:02+5:30
जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक

मिरज शासकीय रूग्णालयात आयसीयु बेड्सची संख्या वाढविणार - जयंत पाटील
सांगली : जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील गोरगरीब रुग्णांसाठी मिरज येथील शासकीय रुग्णालय आधार आहे. सध्या येथे ३५८ बेड्स कोरोना रूग्णांसाठी आहेत. उपजिल्हा रूग्णालये आणि ग्रामीण रूग्णालयातून पुढील उपचारांसाठी याठिकाणी रुग्ण पाठवले जातात त्यामुळे या रुग्णालयातील आयसीयु बेडची संख्या वाढविण्यात येणार आहे, असे निर्देश पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिले.
जिल्ह्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. यावेळी महापौर दिग्वीजय सुर्यवंशी, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, आयुक्त नितीन कापडणीस यांची प्रमुख उपस्थिती होती.
पालकमंत्री पाटील म्हणाले, सध्या जिल्ह्यात १३ हजाराहून अधिक रूग्ण उपचार घेत आहेत. यात दररोज हजारांची वाढ होत आहे. वाढत्या रूग्णसंख्येमुळे सध्या ऑक्सिजनची गरज ४० टनापर्यंत गेली असून तुलनेने ऑक्सिजनचा पुरवठा कमी होत आहे.अशा स्थितीत ऑक्सिजन प्लाँटची उभारणी लवकरात लवकर करावी. रुग्णांना योग्य व वेळेत उपचार मिळावेत यासाठी प्रशासनाने नियोजन करावे.
जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, वाढती रूग्णसंख्या पहाता मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील रूग्णालयात आयसीयु बेड्स वाढविणे आवश्यक आहे. खाजगी रूग्णालयांच्या तुलनेत या रूग्णालयाची स्थिती चांगली आहे. आवश्यकता असल्यास यंत्रणाही उपलब्ध करून देता येणे शक्य आहे. यावर पालकमंत्र्यांनी बेड्स वाढविण्याच्या व रेमडेविर इंजेक्शन व ऑक्सीजन वापराबाबत सूचना दिल्या.