डायल करा ११२; गुटखा, तंबाखू तस्करांना बसणार तत्काळ बेड्या
By घनशाम नवाथे | Updated: October 6, 2025 17:35 IST2025-10-06T17:34:04+5:302025-10-06T17:35:12+5:30
उत्पादन, साठा, तस्करीसह विक्रीबाबतही कारवाई होणार

संग्रहित छाया
घनशाम नवाथे
सांगली : राज्यात आपत्कालीन प्रसंगात मदतीसाठी कार्यरत असलेल्या डायल ११२ आणि हेल्पलाइन क्रमांक १०० वर आता गुटखा, पानमसाला, सुगंधी सुपारी व तंबाखू तस्करी, विक्री आणि उत्पादनाबद्दल तक्रार करता येणार आहे. त्यामुळे आपत्कालीन प्रसंगी अवघ्या काही मिनिटात उपलब्ध होणारी डायल ११२ ची टीम गुटखा, सुगंधी तंबाखूविरोधात कारवाईसाठी तत्काळ धावेल.
राज्यात गुटखा, पानमसाला, सुगंधित सुपारी, सुगंधित तंबाखू आणि तत्सम पदार्थांची निर्मिती, साठवणूक, वितरण, वाहतूक किंवा विक्री यावर बंदी घालण्यात आली आहे. परंतु ही बंदीची अंमलबजावणी पूर्णपणे होत नाही. कारण बंदी असलेला गुटखा, सुगंधी तंबाखू, पानमसाला कोणत्याही गल्ली-बोळात अगदी सहजपणे मिळतो. त्यामुळे शासनाची बंदी केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसून येते.
राज्यात प्रतिबंधित अन्नपदार्थांची निर्मिती, साठवणूक, वितरण, वाहतूक किंवा विक्री याबद्दल नागरिकांच्या तक्रारी नोंदवण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने टोल फ्री १८००२२२३६५ हा क्रमांक कार्यान्वित केला आहे. परंतु, अद्यापही बऱ्याच जणांना तो माहिती नाही. त्यामुळे या टोल फ्री क्रमांकाचा म्हणावा तसा उपयोग होत नाही.
अन्न व औषध प्रशासनाच्या टोल फ्री क्रमांकाबरोबर नागरिकांना गुटखा, सुगंधी तंबाखू, पानमसाला याबाबत तत्काळ तक्रार करता यावी यासाठी पोलिसांनी डायल ११२ व हेल्पलाइन १०० क्रमांक उपलब्ध करून दिला आहे. राज्यातील डायल ११२ हा क्रमांक आपत्कालीन सेवेसाठी कार्यरत आहे. गेल्या तीन वर्षांत या क्रमांकामुळे अनेकांना तत्काळ मदत मिळाली आहे. पूर्वीच्या १०० क्रमांकापेक्षा हा अधिक तत्पर सेवेसाठी नागरिकांच्या लक्षात राहिला आहे.
डायल ११२ क्रमांकावर तक्रार नोंदवल्यानंतर पोलिस पथक अवघ्या काही मिनिटांत घटनास्थळी दाखल होते. काही ठिकाणी तर पथक आठ ते दहा मिनिटांत हजर होऊन मदत पुरवते. आता नागरिकांना आपत्कालीन प्रसंगाबरोबर गुटखा, सुगंधी तंबाखू याच्या तस्करी, विक्रीबाबत डायल ११२ व हेल्पलाइन शंभर क्रमांकावर तक्रार करता येईल. या तक्रारीनंतर ज्या हद्दीतून तक्रार येईल तेथील स्थानिक पोलिस ठाण्यामार्फत तत्काळ कायदेशीर कारवाई केली जाईल.
सर्व पोलिस ठाण्यांना सूचना
राज्याचे विशेष पोलिस महानिरीक्षक (कायदा व सुव्यवस्था) डॉ. मनोजकुमार शर्मा यांनी राज्यातील सर्व पोलिस आयुक्तालय व अधीक्षक कार्यालय यांना गुटखा, पानमसाला, सुगंधी तंबाखूबाबतच्या तक्रारीसाठी डायल ११२ व हेल्पलाइन क्रमांक १०० उपलब्ध राहील असे नुकतेच कळवले आहे.
तस्करीला आळा बसणार
सांगली जिल्ह्याच्या शेजारील कर्नाटकात गुटखा, पानमसाला, सुगंधी तंबाखूवर बंदी नाही. तेथून दररोज वेगवेगळ्या मार्गाने तस्करी होते. त्यामुळे जिल्ह्यातील कोणत्याही गावातील गल्लीबोळात गुटखा, पानमसाला मिळतो. परंतु आता नागरिकांना तक्रारीसाठी डायल ११२ व हेल्पलाइन १०० क्रमांक खुला केल्यामुळे तस्करी, विक्रीला आळा बसेल.
नेटवर्क उद्ध्वस्त करण्याचे आव्हान
अनेक तरुण सध्या गुटखा, मावा यांच्या अधीन गेले आहेत. बंदी असूनही सहज उपलब्ध होत असल्यामुळे व्यसनाधिनता वाढतच चालली आहे. तस्करीचे गल्लीबोळापर्यंतचे नेटवर्क उद्ध्वस्त करण्यासाठी डायल ११२, १०० वर तक्रार करता येईल.