आता पाऊस येणार मोठा, चिंतेचे ढग हटणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:17 IST2021-07-05T04:17:32+5:302021-07-05T04:17:32+5:30
सांगली : जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांपासून दडी मारलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली होती, मात्र भारतीय हवामान खात्याने आता आनंदाची ...

आता पाऊस येणार मोठा, चिंतेचे ढग हटणार
सांगली : जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांपासून दडी मारलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली होती, मात्र भारतीय हवामान खात्याने आता आनंदाची बातमी दिली आहे. येत्या दोन दिवसात पाऊस सक्रिय होणार असून, ७ व ८ जुलै रोजी मुसळधार सरी कोसळण्याची चिन्हे आहेत.
हवामान खात्याने रविवारी सायंकाळी या संदर्भातील अहवाल दिला. त्यात त्यांनी म्हटले आहे की, दि. ५ व ६ जुलै रोजी मध्यम स्वरुपाच्या पावसाची हजेरी जिल्ह्याच्या बहुतांश भागात लागणार आहे. त्यानंतर ७ व ८ जुलैला सलग दोन दिवस मुसळधार पावसाची हजेरी लागणार आहे. दि. ९ व १० जुलै रोजी पावसाचा जोर थोडा कमी होण्याची शक्यता आहे. सध्या जिल्ह्यात पेरण्या करुन शेतकरी पावसाची प्रतीक्षा करत आहेत. पावसाने अचानक दडी मारल्याने चिंतेचे ढग जिल्ह्यात दाटले होते. जुलैचा दुसरा आठवडा शेतकऱ्यांसाठी आनंददायी ठरण्याची शक्यता आहे.
रविवारी सांगली शहर व परिसरात अंशत: ढगाळ वातावरण होते. रविवारी सकाळी नोंदलेल्या आकडेवारीनुसार चोवीस तासात ०.५ मि. मी. पावसाची नोंद झाली. कमाल तापमान सध्या ३१ व किमान तापमान २२ अंश सेल्सिअसवर स्थिर आहे. येत्या चार दिवसात तापमानात घट होण्याची शक्यता आहे.