आता आषाढामध्येही शुभमंगल सावधान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:19 IST2021-07-16T04:19:39+5:302021-07-16T04:19:39+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : परंपरेनुसार आषाढात शुभकार्य टाळली जातात, मात्र, यंदाच्या आषाढात निकड पाहून विवाह सोहळे होऊ लागले ...

आता आषाढामध्येही शुभमंगल सावधान
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : परंपरेनुसार आषाढात शुभकार्य टाळली जातात, मात्र, यंदाच्या आषाढात निकड पाहून विवाह सोहळे होऊ लागले आहेत. यासाठी काढीव मुहूर्ताचा आधार घेतला जात आहे. सध्या लॉकडाऊनचे निर्बंध असल्याने अगदी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत सोहळे आटोपले जात आहेत.
साैर पंचांगाप्रमाणे वर्षातील हा चौथा महिना असतो. सूर्य जेव्हा १६ जुलैच्या सुमारास कर्क राशीत प्रवेश करतो तेव्हा हिंदू पंचांगातील आषाढ सुरू होतो. याकाळात शुभकार्ये वर्ज्य मानली जातात. सध्या कोरोनाचा काळ आहे. लॉकडाऊन व त्यातील निर्बंधांमुळे लोकांसमोर विवाह सोहळ्यावरून अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे मुहूर्त शोधून अडचणीतून सोहळे पार पाडले जात आहेत. गौण काळात असे मुहूर्त शोधले जातात. अनेक पंचांगकर्त्यांनीही या महिन्यात मुहूर्त दिलेले आहेत. चातुर्मासाचा काळही विवाह सोहळ्यांसाठी वर्ज्य मानला जातो, मात्र, या काळातही शुभमुहूर्त पाहून लग्नसमारंभाचे नियोजन करण्यात येत आहे.
चौकट
आषाढातही मुहूर्त
पंचागकर्त्यांनी या महिन्यात १२, २५, २६, २८, २९ जुलैला विवाह मुहूर्त प्रसिद्ध केले आहेत. त्यानुसार आता २५ तारखेपासून पुढील मुहूर्तावर लग्नसोहळे आटोपण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे.
कोट
आषाढात शुभमुहूर्त टाळले जायचे, पण आता निकडीच्यावेळी गौणकाळातही शास्त्राच्या आधारानुसार मुहूर्त काढले जात आहेत. सध्या कोरोनाचे निर्बंध आहेत. त्यामुळे या काळात गरजेनुसार लग्नांसाठी शुभमुहूर्त काढले जात आहेत.
- संतोष गाडगीळ, भटजी, सांगली
चौकट
परवानगी केवळ २५ लोकांचीच
सांगली जिल्ह्यात सध्या कडक लॉकडाऊन लागू असून लग्नसोहळ्यांकरीता केवळ २५ लोकांच्या उपस्थितीची परवानगी दिली जात आहे. वर आणि वधूच्या घरचे व अगदी जवळचे नातेवाईक घेऊनच लग्नसोहळे करावे लागत आहेत.
चौकट
मंगल कार्यालये पडली ओस
मंगल कार्यालय चालक संतोष भट म्हणाले की, सध्या २५ लोकांच्या उपस्थितीचे बंधन असल्याने मंगल कार्यालयांमध्ये सोहळे टाळले जात आहेत. इतक्या लोकांसाठी कार्यालय परवडत नसल्याने घरात, शेतात किंवा मठ, मंदिरांमध्ये लग्न करण्याकडे लोकांचा कल वाढला आहे. त्यामुळे कार्यालय व त्यावर अवलंबून असलेल्या लोकांच्या आर्थिक अडचणी वाढल्या आहेत.