दांडीबहाद्दर नऊ अधिकाऱ्यांना नोटिसा
By Admin | Updated: January 2, 2015 00:08 IST2015-01-01T22:50:22+5:302015-01-02T00:08:02+5:30
लोकशाही दिनास अनुपस्थिती : खुलासा द्यावा लागणार; अधिकाऱ्यांत खळबळ

दांडीबहाद्दर नऊ अधिकाऱ्यांना नोटिसा
दिलीप मोहिते -विटा -तालुकास्तरावर आयोजित करण्यात आलेल्या लोकशाही दिनाला विविध शासकीय व निमशासकीय विभागाचे अधिकारी व कार्यालय प्रमुखांना स्वत: हजर राहण्याचे आदेश दिले असतानाही, विटा येथे दि. १५ डिसेंबरला झालेल्या लोकशाही दिनाला तालुक्यातील ९ अधिकाऱ्यांनी दांडी मारल्याने या अधिकाऱ्यांना तहसीलदार सौ. अंजली मरोड यांनी शिस्तभंगाची कारवाई का करू नये, याबाबतच्या कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत. त्यामुळे दांडी मारणाऱ्या अधिकाऱ्यांना याबाबतचा खुलासा सादर करावा लागणार असून, खुलासा सादर न झाल्यास अथवा तो खुलासा संयुक्तिक न वाटल्यास शिस्तभंगाच्या कारवाईसह खातेनिहाय चौकशीला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे या नऊ अधिकाऱ्यांत खळबळ उडाली आहे.
खानापूर तालुका महसूल विभागाच्यावतीने विटा येथे प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. दि. १५ डिसेंबरला तालुकास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यापूर्वी सर्व शासकीय व निमशासकीय विभागातील अधिकारी किंवा कार्यालय प्रमुखांना तहसीलदार सौ. मरोड यांनी उपस्थित राहण्याचे लेखी आदेश दिले होते. परंतु, या लोकशाही दिनाकडे खानापूर तालुक्यातील नऊ अधिकाऱ्यांनी पाठ फिरवली होती. त्यामुळे तहसीलदार मरोड यांनी लोकशाही दिनाला गैरहजर असलेले राज्य उत्पादन शुल्कचे अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता, उपकोषागार कार्यालय, सहकारी संस्थांचे सहायक निबंधक, सुळेवाडी येथील पाटबंधारे मुख्यालयातील शाखाधिकारी, लघुपाटबंधारे विभागातील स्थानिक स्तरचे अधिकारी, दुकाने निरीक्षक, लघुपाटबंधारे उपविभाग क्र. १ चे उपअभियंता व विटा ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक अशा नऊ अधिकाऱ्यांना तहसीलदार सौ. मरोड यांनी शिस्तभंगाची कारवाई का करू नये, याबाबत कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
दरम्यान, विटा येथील लोकशाही दिनाला दांडी मारणाऱ्या या नऊ अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावून त्यांच्याकडून खुलासा मागविण्यात आला असून, हा खुलासा आठ दिवसात न दिल्यास किंवा दिलेला खुलासा संयुक्तिक न वाटल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई अथवा त्यांची खातेनिहाय चौकशी करण्यासाठीचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात येणार असल्याने, लोकशाही दिनाकडे पाठ फिरविणाऱ्या अधिकाऱ्यांत खळबळ उडाली आहे.
कारवाई होणार का?
लोकशाही दिनाबाबत अधिकाऱ्यांमध्ये फारसे गांभीर्य असल्याचे दिसत नाही. काही दिवसांपूर्वी सांगलीत झालेल्या लोकशाही दिनासही वरिष्ठ अधिकारी गैरहजर होते. विटा येथील लोकशाही दिनाला दांडी मारणाऱ्या नऊ अधिकाऱ्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावून त्यांच्याकडून खुलासा मागविण्यात आला आहे. मात्र आजवरचा अनुभव पाहता, या अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.