महापालिकेची वीज कंपनीला नोटीस

By Admin | Updated: August 26, 2015 23:00 IST2015-08-26T23:00:43+5:302015-08-26T23:00:43+5:30

दोन कोटी बत्तीस लाख द्या : ट्रान्स्फॉर्मरसाठी दिलेल्या भूखंडांबाबत आज बैठक; महापौर आक्रमक

Notice to Municipal Corporation Electricity Company | महापालिकेची वीज कंपनीला नोटीस

महापालिकेची वीज कंपनीला नोटीस

सांगली : महापालिका हद्दीतील चार मोक्याचे भूखंड वीज वितरण कंपनीला देण्यात आले आहेत. या जागांपोटी दोन कोटी ३२ लाख रुपये महापालिकेने द्यावेत, अन्यथा भूखंड पुन्हा ताब्यात घेण्याची नोटीस बुधवारी बजाविण्यात आली. यासंदर्भात गुरुवारी महापौरांच्या दालनात वीज महावितरण अधिकाऱ्यांची बैठक बोलाविण्यात आली आहे. वीज मंडळाकडून महापालिकेला कोणतेही सहकार्य मिळत नसल्याने, महापौर विवेक कांबळे यांनी याप्रश्नी आक्रमक भूमिका घेतली आहे. शहरात ट्रान्स्फॉर्मर बसविण्यासाठी पाच वर्षापूर्वी महाआघाडीच्या काळात चार भूखंड वीज कंपनीला देण्यात आले. त्याबदल्यात वीज कंपनीने सांगली व मिरज शहरातील रस्ता रुंदीकरणातील खांब हस्तांतरण करून द्यावयाचे होते. या कामात वीज मंडळाकडून मोठी दिरंगाई झाली आहे. केवळ सांगलीतील दत्त-मारुती रस्त्याचे काम पूर्ण झाले असून उर्वरित तीन रस्त्यांवरील खांब हस्तांतरणाचे काम अपूर्ण आहे. महापालिकेने वारंवार वीज कंपनीशी संपर्क साधला, पण त्याला फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. त्यातच शहरात खांब, ट्रान्स्फॉर्मर बसविताना महापालिकेचे ना हरकत प्रमाणपत्र घेणे बंधनकारक आहे. पण आजअखेर वीज कंपनीने ना हरकत न घेताच खांब उभे केले आहेत. विशेषत: गुंठेवारी भागात मोठ्या प्रमाणात विजेचे खांब उभे केले आहेत. अनेक ठिकाणी ट्रान्स्फॉर्मर बसविण्यात आले असून ते अडचणीचे ठरत आहेत. या प्रश्नांवर महापौर विवेक कांबळे यांनी बुधवारी मालमत्ता व्यवस्थापक रमेश वाघमारे, विद्युत विभागाचे प्रमुख अमर चव्हाण यांची झाडाझडती घेतली. त्यानंतर वीज कंपनीला दिलेल्या भूखंडांची शासकीय दरानुसार होणारी दोन कोटी ३२ लाख रुपये रक्कम महापालिकेकडे भरण्याची नोटीस बजाविण्यात आली आहे. तसेच गुरुवारी वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांची बैठकही महापौरांच्या दालनात बोलाविण्यात आली आहे. या बैठकीत वीज अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली जाणार आहे. (प्रतिनिधी)

खांब हस्तांतरणाचे काम
पंचमुखी मारुती रोड - १५.५० लाख
मिरज शिवाजी रोड - ३८ लाख
दत्त-मारुती रोड - ११ लाख
दत्तनगर - ७.८१ लाख
एकूण - ७१.८१ लाख


दादागिरी सहन करणार नाही : महापौर
वीज महावितरणकडून महापालिकेला कोणतेही सहकार्य मिळत नाही. त्यांची दादागिरी सहन करणार नाही, असा इशारा महापौर विवेक कांबळे यांनी दिला. ते म्हणाले की, महापालिकेची जागा फुकटात वापरायची आणि नागरिकांकडून विजेवर पैसे कमवायचे, हा धंदा सुरू आहे. एकाही खांबाला महापालिकेची नाहरकत घेतलेली नाही. आम्ही मात्र त्यांना नेहमीच सहकार्याची भूमिका घ्यायची, हा कुठला न्याय? घर मालकाचे आणि रुबाब भाडेकरूंचा, असा प्रकार वीज कंपनीकडून सुरू आहे. कंपनीने महापालिकेचे पैसे दिले नाहीत, तर या जागा ताब्यात घेतल्या जातील. त्यासाठी प्रसंगी कायदेशीर लढाईचीही तयारी आहे.


महापालिकेने दिलेल्या जागा व त्यांची किंमत
ठिकाणक्षेत्रफळकिंमत
१. कोल्हापूर रोड ८६३ चौ.मी.९१ लाख ६५ हजार
२. टिंबर एरिया२००० चौ.मी.५० लाख
३. कुपवाड४५३९ चौ.मी. ७.९८ लाख
४. शाळा क्र. २२ १३७५ चौ.मी.८३.०५ लाख

Web Title: Notice to Municipal Corporation Electricity Company

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.