पहिला डोस नाही, दुसऱ्या डोससाठी आठ हजार मात्रा आल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:29 IST2021-05-07T04:29:19+5:302021-05-07T04:29:19+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : कोरोना लसीकरणाच्या दुसऱ्या डोससाठी आठ हजार लसींच्या मात्रा जिल्ह्याला गुरुवारी मिळाल्या. त्यामुळे शुक्रवारी जिल्हाभरात ...

पहिला डोस नाही, दुसऱ्या डोससाठी आठ हजार मात्रा आल्या
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : कोरोना लसीकरणाच्या दुसऱ्या डोससाठी आठ हजार लसींच्या मात्रा जिल्ह्याला गुरुवारी मिळाल्या. त्यामुळे शुक्रवारी जिल्हाभरात फक्त दुसऱ्या डोसचे लसीकरण सुरू राहील.
लसींच्या तुटवड्यामुळे शासनाने दुसरा डोस घेणाऱ्यांना प्राधान्य दिले आहे. पहिल्या डोससाठीचा साठा संपुष्टात आला आहे. गुरुवारी आलेल्या ८ हजार मात्रांमधून दुसरा डोस देण्याच्या सूचना आहेत, मात्र त्याच्या नोंदणीचे पोर्टल रात्री उशिरापर्यंत सुरू झालेले नव्हते. बुधवारी १८ हजार ४०० डोस आले होते, त्यातून गुरुवारी दिवसभरात लसीकरण सुरू राहिले. जिल्हाभरातील ५९ प्राथमिक आरोग्य केंद्रांना अत्यल्प पुरवठा करण्यात आला होता, त्यामुळे सर्वत्र झुबंड उडाल्याचे दिसून आले. महापालिका क्षेत्रातही गुरुवारी फक्त ८४० जणांना लस मिळू शकली.
बुधवारी मिळालेले १८ हजार डोस संपत आले आहेत, त्यामुळे शुक्रवारी पहिला डोस मोजक्याच लाभार्थींना मिळेल. लस शिल्लक असेल त्यानुसार पहिला डोस दिला जाईल. नोंदणी केल्यानुसार लसीसाठी प्राधान्य मिळणार आहे. १८ ते ४५ वर्षे वयोगटासाठीही लस उपलब्ध असून, पाच केंद्रांवर लस मिळेल, मात्र त्यासाठीही नोंदणी आवश्यक आहे.
चौकट
गुरुवारचे लसीकरण असे
१८ ते ४५ वर्षे - ९८५
४५ ते ६० वर्षे - ५,९८९
६० वर्षांवरील - ६,०५२
दिवसभरात एकूण - १३,७८२
आजवर एकूण - ५,८६,१०६