डॉक्टर नव्हे, देवदूत...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:19 IST2021-07-01T04:19:19+5:302021-07-01T04:19:19+5:30
आज काेराेनाच्या संकटात सारा समाज डॉक्टरांकडे आशेने पाहत आहे. त्या सर्वांना या संकटातून बाहेर काढून स्वत:ची काळजी घेत राष्ट्र ...

डॉक्टर नव्हे, देवदूत...!
आज काेराेनाच्या संकटात सारा समाज डॉक्टरांकडे आशेने पाहत आहे. त्या सर्वांना या संकटातून बाहेर काढून स्वत:ची काळजी घेत राष्ट्र पुढे नेण्याचा प्रयत्न देशभरातील डॉक्टरांकडून सुरू आहे आणि ते कर्तव्य डॉक्टर चोखपणे पार पाडत आहेत, याचा सर्वांना अभिमान आहे. या तणावाच्या परिस्थितीत डॉक्टरसुद्धा मानसिक तसेच शारीरिक तणावाचे बळी होत आहेत, याचे भान ठेवून नागरिकांनी त्यांची काळजी घेत घरीच थांबायला हवे. स्वत:च्या जिवाची पर्वा न करता, कुटुंबापासून दूर राहून डॉक्टर दिवसरात्र कोरोना रुग्णांवर उपचार आणि त्यांची सेवा करीत आहेत. कोरोनाकाळात डॉक्टरांनी केलेली देशसेवा खरंच खूप कौतुकास्पद आहे. त्यामुळे डॉक्टरांना त्यांच्या अनमोल कार्याबद्दल शुभेच्छा देणे, त्यांचे कौतुक करणे आपले कर्तव्य बनते.
डॉक्टर व देव या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. रुग्णांना कमीत कमी आर्थिक मोबदल्यात उत्तम सुविधा पुरविण्याच्या धावपळीत डॉक्टरांची दमछाक होते आणि त्यांचा ताण वाढतो. ही बाबही ‘डॉक्टर्स डे’च्या निमित्ताने लक्षात घ्यायला हवी. आजही गावखेड्यांत डॉक्टरास परमेश्वराचे रूप मानले जाते. दुर्धर आजारातून मुक्त झाल्यावर किंवा अपघातानंतर मृत्यूशी झुंज देऊन पुन्हा जीवन सुरळीत झाल्यानंतर ‘डॉक्टरांमुळेच पुनर्जन्म मिळाला’, अशी अनेकांची भावना असते. ते तसे बोलूनही दाखवितात. अनेक रुग्णांसाठी, त्यांच्या नातेवाइकांसाठी डॉक्टर हा त्यांच्या आयुष्यात आलेला ‘देवदूत' ठरत असतो. त्यांच्या कौशल्याने, ज्ञानाने अनेकांना जीवदान मिळते.
१ जुलै हा भारताचे प्रसिद्ध चिकित्सक डॉ. बिधानचंद्र रॉय यांचा जन्मदिवस. त्यांना श्रद्धांजली आणि सन्मान म्हणून हा दिवस ‘डॉक्टर्स डे' म्हणून साजरा केला जातो. १९९१ मध्ये केंद्र सरकारने या दिवशी ‘डॉक्टर्स डे' साजरा करावा, असा निर्णय घेत सुरुवात केली. ४ फेब्रुवारी १९६१ ला डॉ. बिधानचंद्र रॉय यांना भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘भारतरत्न' बहाल करण्यात आला आहे. डॉ. रॉय यांचा जन्म १ जुलै १८८२ राेजी पटणा (बिहार) येथे झाला. फिजिशियन डॉ. बिधानचंद्र रॉय हे पश्चिम बंगालचे दुसरे मुख्यमंत्री होते. त्यांच्या दूरदर्शी नेतृत्वामुळे डॉ. रॉय यांना ‘पश्चिम बंगालचे आर्किटेक्ट’ असेही म्हणतात. डॉ. रॉय यांचे शिक्षण कलकत्त्यामध्ये झाले. त्यांनी ‘एमआरसीपी' आणि ‘एफआरसीएस'ची डिग्री लंडनमधून घेतली. १९११ पासून त्यांनी भारतात वैद्यकीय सेवा देण्यास सुरुवात केली. आज डॉक्टर ‘कोविड-१९' अर्थात ‘कोरोना’विरोधात लढा देत आहेत. आपला जीव धोक्यात घालून रुग्णांचे प्राण वाचवीत आहेत. सांगली जिल्ह्याचा विचार केला तर खूप मोठ्या प्रमाणात डॉक्टर व त्यांची यंत्रणा कोरोनाविरोधात लढा देत आहे.
आज ‘डॉक्टर डे’निमित्त त्यांच्या कार्याला शतश: नमन....!
- प्रतिनिधी