बोर्डाची नव्हे, ही तर कोरोनाचीच परीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:28 IST2021-02-24T04:28:15+5:302021-02-24T04:28:15+5:30
सांगली : राज्यभरात कोरोनाचा उद्रेक पुन्हा सुरू झालेला असताना शासनाने दहावी-बारावीच्या परीक्षा ऑफलाईन घेणार असल्याचे जाहीर केले आहे. यावर ...

बोर्डाची नव्हे, ही तर कोरोनाचीच परीक्षा
सांगली : राज्यभरात कोरोनाचा उद्रेक पुन्हा सुरू झालेला असताना शासनाने दहावी-बारावीच्या परीक्षा ऑफलाईन घेणार असल्याचे जाहीर केले आहे. यावर पालकांच्या प्रतिक्रिया संमिश्र आहेत. गेले वर्षभर विद्यार्थ्यांना ऑनलाईन अभ्यासाातून गुणत्तेसाठी संघर्ष करावा लागला, आता ऑफलाईन परीक्षेच्या निमित्ताने पालकांपुढे धर्मसंकट उभे असल्याचे प्रतिक्रियांमधून जाणवले.
शिक्षणमंत्र्यांनी सोमवारी ऑफलाईन परीक्षेचा निर्णय जाहीर केला. दहावीच्या लेखी परीक्षा २९ एप्रिल ते २० मे या कालावधीत, तर बारावीच्या लेखी परीक्षा २३ एप्रिल ते २१ मे या कालावधीत प्रत्यक्ष केंद्रावर होणार आहेत. राज्यात सध्या कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. अनेक शहरांत अंशत: संचारबंदीही जाहीर झाली आहे. या स्थितीत परीक्षेसाठी मुलांना शाळेत पाठविण्याविषयी पालकांत दुमत आहे. सांगली जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या सध्या अत्यल्प आहे. दररोजचे नव्याने बाधितही १० ते ३० दरम्यान आहेत, पण शेजरच्या सातारा, कोल्हापूर, पुणे जिल्ह्यात उद्रेक होऊ लागला आहे. तेथून रुग्ण सांगलीकडे पसरायला वेळ लागणार नाही. परीक्षा प्रत्यक्ष सुरू होईपर्यंत जिल्ह्यातही संख्या वाढू शकते, त्यामुळे पालक चिंतेत आहेत.
कोट
प्रत्यक्ष केंद्रावर कोरोनाची पुरेशी काळजी घेऊन परीक्षा घ्यायला हरकत नाही, पण काळजी घेताना प्रामाणिकपणा राहिला पाहिजे. मास्क, सॅनिटायझर देखाव्यापुरते नकोत. प्रत्येक विद्यार्थ्याला प्रसंगी शाळेने मास्क द्यायला हवा. प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिकांचेही शंभर टक्के निर्जंतुकीकरण झाले पाहिजे. सुपरवायझर म्हणून काम करणाऱ्या प्रत्येक शिक्षकाची कोरोना चाचणी झाली पाहिजे.
- संजय रुपलग, पालक
कोट
शिक्षणमंत्र्यांनी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले असले तरी राज्यात सर्वत्र सुरक्षित वातावरण नाही. काही भागांत रुग्णसंख्या जाेमाने वाढतेय, तर काही ठिकाणी नियंत्रणात आहेत. प्रत्यक्ष परीक्षेचे दिवस येईपर्यंत कशी स्थिती राहील यावर परीक्षेची अंमलबजावणी ठरवावी. कोणाच्या तरी दबावाखाली विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका पोहोचवू नये.
- अनिता कदम, पालक
कोट
प्रत्यक्ष परीक्षेचा हट्ट शासनाने धरू नये. ऑनलाईन परीक्षा हादेखील उपाय आहे. पदवीसह अन्य परीक्षा ऑनलाईन स्वरूपातच झाल्या, त्यामुळे बारावीच्याही तशाच घेणे शक्य आहे.
- अविनाश शेटे, पालक
कोट
पुणे, मुंबई व विदर्भात रुग्णसंख्या वाढत असल्याने राज्यात सर्वत्र एकाचवेळी परीक्षा शक्य नाहीत. त्यामुळे त्या पुढे ढकलाव्यात. ऑनलाईनमुळे दहावी-बारावीचा संपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण झालेला नाही. त्यामुळे अपूर्ण अभ्यासावर परीक्षा घेणे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर अन्याय करणारे ठरेल. स्थिती नियंत्रणात येईपर्यंत कोणत्याच माध्यमातून परीक्षा घेऊ नयेत.
- अमर भानुसे, पालक
कोट
यंदा वर्षभर नियमित शाळा न झाल्याने विद्यार्थ्यांचे शिक्षण पूर्ण झालेले नाही. याचा विचार करता एप्रिल-मे महिन्यातील परीक्षा पुढे ढकलाव्यात. ऑनलाईन अभ्यास पुढे सुरू ठेवृून राहिलेला अभ्यासक्रम पूर्ण करावा, तोपर्यंत कोरोनाची साथ कमी झाल्यास परीक्षा घ्याव्यात. तूर्त ऑनलाईन आणि ऑफलाईन हे दोन्ही मार्ग मागे घ्यावेत.
- त्रिशला वायचळ, पालक
कोट
गेल्या काही दिवसांत प्रत्यक्ष वर्ग भरू लागले आहेत, पण विद्यार्थी कोरोनाबाधित झाल्याचे चित्र नाही. त्यामुळे वर्गात परीक्षा घ्याव्यात. कोरोनाची अत्यंत कडक काळजी घेण्याची जबाबदारी शाळा व बोर्डाने घ्यावी. परीक्षा झाल्या नाहीत तर विद्यार्थ्यांचे वर्षभराचे शैक्षणिक नुकसान होईल.
- राजेंद्र खराडे, पालक
पॉईंटर्स
- दहावीचे परीक्षार्थी - ४०,८४४
- बारावीचे परीक्षार्थी - ३३,०९०