इस्लामपुरात निशिकांतदादांचे शक्तिप्रदर्शन
By Admin | Updated: October 27, 2016 23:21 IST2016-10-27T23:04:46+5:302016-10-27T23:21:21+5:30
पालिका निवडणूक : विविध प्रभागांतून ६ जणांचे उमेदवारी अर्ज दाखल

इस्लामपुरात निशिकांतदादांचे शक्तिप्रदर्शन
सांगली : निष्ठावंतांपेक्षा पैशाला अधिक महत्त्व राजकारणात दिले जाते, अशी खंत राष्ट्रवादी नेते दिलीपतात्या पाटील यांनी बुधवारी व्यक्त केल्यानंतर पक्षांतर्गत खळबळ माजली. या मताशी सहमत असलेले सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते सोशल मीडियावर गुरुवारी एकवटले आणि त्यांनीही तात्यांसारखीच खदखद व्यक्त केली. दरम्यान, राष्ट्रवादीने त्यांची नाराजी दूर करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.
सांगली-सातारा विधानपरिषद निवडणुकीसाठी दिलीपतात्या पाटील यांनी इच्छुक म्हणून पक्षाकडे प्रयत्न केले होते. अचानक राष्ट्रीय समाज पक्षातून शेखर गोरे यांना राष्ट्रवादीने आपल्याकडे खेचून त्यांना उमेदवारी दिली. या गोष्टीने धक्का बसलेल्या दिलीपतात्यांनी सोशल मीडियावरून आपल्यातील नाराजी व्यक्त केली. राजकारणात निष्ठा, कर्तृत्व आणि चारित्र्य याला किंमत नाही. शेवटी पैसा श्रेष्ठ आहे. वाममार्गाने पैसा मिळविणाऱ्यांसाठी राजकीय नेते पायघड्यासुद्धा घालतील, अशा शब्दात त्यांनी खंत व्यक्त केली होती. त्यांच्या या मतप्रदर्शनानंतर राजकीय गोटात विशेषत: राष्ट्रवादीत खळबळ माजली. दिलीपतात्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांसह सर्वच पक्षातील नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांच्या मताशी सहमती दर्शविली. गुरुवारीही यात मोठी भर पडली.
उमेदवारीचे निकष ज्यापद्धतीने ठरविले जात आहेत, त्यावर सोशल मीडियावर जोरदार टीका सुरू झाली आहे. केवळ राष्ट्रवादीच नव्हे, तर सर्वच पक्षात ही अवस्था असल्याचे मतही एका कार्यकर्त्याने मांडले आहे. निष्ठावंतांना राजकीय पातळीवर किंमत नसल्याची बाब अनेकांनी मांडली. प्रत्येक पक्षातील अशा समदुखी लोकांचे संघटन सोशल मीडियावर दिसून आले. सुरात सूर मिसळून अनेकांनी मनातील खदखद व्यक्त केली.
दरम्यान, दिलीपतात्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न पक्षीय पातळीवर सुरू झाला आहे. विधानपरिषद निवडणुकीच्या काळातच पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांमार्फत त्यांची समजूत काढण्यात येणार असल्याचे समजते.
दरम्यान, दिलीपतात्या आपल्या मतावर ठाम आहेत. एखाद्या निष्ठावंत दुसऱ्या कार्यकर्त्याला संधी मिळाली असती, तरीही आपण अशी प्रतिक्रिया दिली नसती, असे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
विलासराव शिंदे : नाराजी दूर करु
याबाबत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे म्हणाले की, दिलीपतात्या पाटील यांच्या नाराजीबद्दल आम्हाला कळाले आहे. लवकरच पक्षाच्या नेत्यांसोबत आम्ही त्यांच्याशी चर्चा करू. निश्चितपणे त्यांची नाराजी दूर केली जाईल. यासाठी लवकरच नेत्याबरोबर बैठकही घेण्यात येईल.