‘जत’मधील नऊ गावांना टँकरने पाणी
By Admin | Updated: July 27, 2014 23:03 IST2014-07-27T22:19:49+5:302014-07-27T23:03:59+5:30
४८ वाड्या-वस्तीतही टंचाई : नागरिकांना पाच खेपांचे पाणी मिळेना

‘जत’मधील नऊ गावांना टँकरने पाणी
जत : ऐन पावसाळ्यातही तालुक्यातील नऊ गावे आणि त्याखालील ४८ वाड्या-वस्त्यांवरील २१ हजार ८२५ नागरिकांना माणसी वीस लिटर या प्रमाणात टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. येथील काही भागात पाऊस झाला आहे, तर काही भागात अत्यल्प पाऊस झाला आहे. पिण्यासाठी पाणी उपलब्ध नसल्याने तेथे टँकरने पाणी दिले जात आहे.
तालुक्यात ढगाळ वातावरण असून, हवेत गारवा निर्माण झाला आहे. अधूनमधून तुरळक प्रमाणात पाऊस पडत आहे. उमराणी, सिंदूर, बसर्गी, वज्रवाड, खिलारवाडी, डफळापूर, एकुंडी, अमृतवाडी, बनाळी ही नऊ गावे आणि परिसरात अत्यल्प पाऊस झाला आहे. त्यामुळे तेथे टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. वज्रवाड व खिलारवाडी येथील टँकर नादुरुस्त आहे. त्यामुळे चार दिवसांपासून तेथील पाणीपुरवठा बंद आहे. पर्यायी टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करावा, अशी मागणी होत आहे.
प्रशासनाने नऊ गावे आणि त्याखालील ४८ वाड्या-वस्त्यांसाठी टँकरच्या २३.५ खेपा मंजूर केल्या आहेत. परंतु भारनियमन, दोन गावांतील जादा अंतर, पाण्याचा उद्भव आणि नादुरुस्त टँकर यांमुळे १८.५ खेपाच मिळत असून, पाच खेपांचे पाणी मिळत नाही. नऊपैकी पाच टँकर शासकीय आहेत. त्यातील दोन नादुरुस्त आहेत. त्यामुळे दोन गावांना टँकरद्वारे पाणी मिळेनासे झाले आहे. शासकीय टँकरपेक्षा खासगी टँकरची पाण्याची क्षमता जादा आहे. शासकीय टँकर सतत नादुरुस्त असतात. (वार्ताहर)