‘निनाईदेवी’चे ३४ कोटींचे कर्ज बनले विनातारणी...

By Admin | Updated: September 1, 2015 22:27 IST2015-09-01T22:27:26+5:302015-09-01T22:27:26+5:30

नियमांचे दहन : जुने कर्ज बाकी असताना नवे कर्जवितरण--जिल्हा बँक गैरव्यवहार-३

'Ninai Devi' made 34 crores loan ... | ‘निनाईदेवी’चे ३४ कोटींचे कर्ज बनले विनातारणी...

‘निनाईदेवी’चे ३४ कोटींचे कर्ज बनले विनातारणी...

सांगली : कोकरूड (ता. शिराळा) येथील निनाईदेवी सहकारी साखर कारखान्याला कर्जपुरवठा करण्यासाठी तत्कालीन संचालक मंडळाने नियमांचे दहन केल्याचे दिसून येते. कार्यालयाची कर्ज मंजुरीची शिफारस नसताना तसेच पूर्वीची कर्जबाकी असतानाही या कारखान्याला नव्याने कर्जपुरवठा करण्यात आला. कारखान्याची आर्थिक स्थिती कमकुवत असतानाही संचालक मंडळाने स्वत:च्या जबाबदारीवर कर्ज मंजूर केले. कारखान्याची संपूर्ण मालमत्ता राज्य बॅँकेने तारण घेतल्याने आता या कर्जास कोणतेही तारण उरले नाही. बॅँकेच्या कार्यकारी समितीने ७ मे २००२ रोजी या कारखान्यास ८ कोटी ७० लाख रुपये मध्यम मुदत कर्ज स्वभांडवलातून मंजूर केले. याला कार्यालयाची शिफारस नाही. कर्ज अपुऱ्या तारणावर दिले असून, सध्या कोणतेही तारण उरले नाही. त्यामुळे या प्रकरणात २५ कोटी ३७ लाख ४ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर बॅँकेच्या संचालक मंडळाने १९९९ ते २००१ या कालावधित वेळोवेळी एकूण ८ कोटी ५० लाखांचे कर्ज मंजूर केले. कारखान्याची आर्थिक परिस्थिती नसताना हा कर्जपुरवठा झाला. त्याचबरोबर ११ मे १९९९ रोजी कारखान्यास सहभाग योजनेतून प्रकल्प उभारणीसाठी ३ कोटी ८१ लाखांचे कर्ज दिले. त्यामुळे एकूण ३४ कोटी ७४ लाख ४० हजार रुपयांची थकबाकी असुरक्षित बनल्याचे स्पष्ट मत चौकशी अधिकारी संपतराव गुंजाळ यांनी अहवालात व्यक्त केले आहे.
कर्जापोटी जिल्हा बँकेकडे कारखान्याने १४.६५ हेक्टर गायरान जमीन तारण दिली होती. याच कारखान्याला राज्य बँकेनेही सहभाग योजनेतून १४ कोटी रुपयांचे कर्ज दिले होते. याच कर्जाच्या वसुलीसाठी राज्य सहकारी बँकेने हा कारखाना परस्पर दालमिया कंपनीला विकला. यामध्ये जिल्हा बँकेकडे तारण असलेल्या जमिनीचाही समावेश होता. जिल्हा बँकेने या प्रकरणी दालमिया कंपनी आणि राज्य सहकारी बँकेविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याचिका दाखल करतानाच जिल्हा बँकेने स्थानिक पोलिसांकडे संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याबाबत फिर्याद दिली होती. त्यामुळे हे कर्जप्रकरण आणि तारण जमिनीचा वाद आता न्यायप्रविष्ट बनला आहे. त्यामुळे बॅँकेच्या थकित कर्जावरील व्याजाचा आकडा वाढत आहे. याशिवाय हे कर्ज आता आणखी असुरक्षित बनले आहे. चौकशी अधिकाऱ्यांनी या सर्व कर्ज प्रकरणांमध्ये तत्कालीन संचालकांना जबाबदार धरले असून, थकित रकमेवरील व्याजालाही तेच जबाबदार असल्याचे म्हटले आहे. (प्रतिनिधी)


हे संचालक अडचणीत
तत्कालीन संचालक मंडळामध्ये प्रकाशबापू पाटील, विष्णुअण्णा पाटील, मदन पाटील, जगन्नाथ म्हस्के, उमाजीराव सनमडीकर यांचाही समावेश आहे. प्रकाशबापू व विष्णुअण्णा यांच्या वारसदारांची नावे त्यामुळे या आरोपपत्रात आली आहेत. विद्यमान संचालकांपैकी विलासराव शिंदे, मोहनराव कदम हे दोन संचालकही याप्रकरणी अडचणीत आले आहेत.

Web Title: 'Ninai Devi' made 34 crores loan ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.