विटा येथे ३८ बेडचे नवीन कोविड रुग्णालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:24 IST2021-04-19T04:24:44+5:302021-04-19T04:24:44+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क विटा : विटा शहरासह खानापूर तालुक्यात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढू लागल्याने रुग्णांना बेड उपलब्ध होत नाहीत, ...

New Kovid Hospital with 38 beds at Vita | विटा येथे ३८ बेडचे नवीन कोविड रुग्णालय

विटा येथे ३८ बेडचे नवीन कोविड रुग्णालय

लोकमत न्यूज नेटवर्क

विटा : विटा शहरासह खानापूर तालुक्यात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढू लागल्याने रुग्णांना बेड उपलब्ध होत नाहीत, त्यामुळे विटा नगरपरिषदेने ३८ बेडचे सर्व सुविधायुक्त कोविड रुग्णालय सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. हे रुग्णालय येत्या दोन दिवसांत रुग्णांच्या सेवेत दाखल होत असल्याचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी सांगितले.

वैभव पाटील म्हणाले, मार्चपासून कोविडची दुसरी लाट आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा कोविड बाधितांना उपचारासाठी रुग्णालयात बेड मिळणे मुश्कील झाले आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री जयंत पाटील व जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी माजी आमदार सदाशिवराव पाटील व मुख्याधिकारी अतुल पाटील यांना विटा नगरपरिषदेने विट्यात तातडीने कोविड रुग्णालयाची उभारणी करावी, अशी विनंती केली होती. विटा व परिसरात दररोज गतीने वाढणारी रुग्णसंख्या पाहता माजी आमदार पाटील यांनी नगरपरिषद कौन्सिल व प्रशासनास तातडीने कोविड रुग्णालय सुरू करण्याची सूचना केली आणि केवळ तीन दिवसांत हे सुसज्ज व सर्व सुविधांयुक्त रुग्णालय सुरू होत आहे.

विटा येथील साळशिंगे रोडला शासकीय निवासी शाळेच्या भव्य इमारतीमध्ये ३८ ऑक्सिनेटेड बेडच्या रुग्णालयाची उभारणी केली असून, याठिकाणी सर्व बेड हे ऑक्सिजन सुविधेसह आहेत.

चौकट

बिलात १५ टक्के सवलत

या हाॅस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांना शासनाने निश्चित करून दिलेल्या दरामध्ये १५ टक्के सूट दिली जाणार असून, या ३८ बेडपैकी किमान २० बेड विटा शहरातील रुग्णांसाठी प्राधान्याने उपलब्ध करून दिले जाणार आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात नगरपरिषदेच्या वतीने सुरू होणारे व शासकीय दरातही १५ टक्के सवलत देणारे हे एकमेव कोविड रुग्णालय असणार आहे, अशी माहिती वैभव पाटील यांनी दिली.

Web Title: New Kovid Hospital with 38 beds at Vita