संतोष भिसेसांगली : कृष्णा नदीवर आणखी एका पुलाची भर पडणार आहे. रत्नागिरी-नागपूर महागामार्गाचा एक भाग म्हणून तो अस्तित्वात येत आहे. उदगाव (ता. शिरोळ) हद्दीत उमळवाडजवळ त्याची उभारणी होणार आहे.राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत हा पूल उभारला जाणार आहे. त्यासाठी भूसंपादनही करण्यात आले आहे. मे महिन्याच्या सुमारास त्याचे प्रत्यक्ष काम सुरू होण्याची शक्यता प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. सध्या या पुलाची निविदा प्रक्रिया सुरू आहे. हा पूल चारपदरी असेल. तो रत्नागिरी-नागपूर महामार्गाचा एक भाग आहे. सध्या उदगाव ते जयसिंगपूर यादरम्यान कृष्णा नदीवर तीन पूल आहेत. एक जुना, दुसरा नवा आणि तिसरा रेल्वेचा पूल आहे. या पुलांपासून सुमारे अर्धा किलोमीटर अंतरावर नवा चौथा पूल उभारला जाईल. रत्नागिरी-नागपूर महामार्ग सध्या अंकलीमध्ये येऊन थांबला आहे. पुढील कामासाठी काही ठिकाणी भूसंपादन पूर्ण झाले असून, काही ठिकाणी प्रक्रिया सुरू आहे. काही ठिकाणी भूसंपादनाला शेतकऱ्यांनी विरोध केल्याने तेथे काम रखडले आहे.मिरजेतून अंकलीपर्यंत आलेला महामार्ग पुढे उमळवाडजवळून जाणार आहे. सध्याच्या अंकली-उदगाव-जयसिंगपूर या रस्त्याशी त्याचा काही संबंध असणार नाही. उमळवाडजवळून आंब्यापर्यंत तो स्वतंत्र प्रवास करेल. यापैकी चोकाक ते अंकली या महामार्गाच्या प्रकल्पासाठी सुमारे ८५० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्यामध्ये या नव्या पुलाच्या खर्चाचाही समावेश आहे. मे महिन्यात काम सुरू झाल्यानंतर काही अडथळे आले नाहीत, तर २०२६ मधील उन्हाळ्यापर्यंत पूल पूर्ण होऊ शकेल.
वाहतुकीच्या कोंडीतूनही मार्ग निघणारसांगली, मिरजेतून कोल्हापूरकडे जाण्यासाठी सध्या अंकली-उदगाव-जयसिंगपूर व अंकली-उमळवाड-तमदलगे बायपास हे रस्ते उपलब्ध आहेत. शिवाय सांगलीतून हरीपूरमार्गे कृष्णा नदीवरील हरीपूर-कोथळी या नव्या पुलावरूनही जाता येते. रत्नागिरी- नागपूर महामार्गावरील प्रस्तावित नव्या पुलामुळे आणखी एक रस्ता मिळणार आहे. यानिमित्ताने अंकलीपासून जयसिंगपूर-चिपरी-इचलकरंजी फाटा या टप्प्यातील वाहतुकीच्या कोंडीतूनही मार्ग निघणार आहे.
कृष्णा नदीवर आठ पुलांचे अस्तित्वसांगलीपासून मिरजेत कृष्णाघाट-अर्जुनवाडपर्यंत कृष्णा नदीवर सध्या आठ पूल अस्तित्वात आहेत. हरीपूर-कोथळी पूल नव्याने उभारण्यात आला असून आयर्विन पुलाला समांतर पुलाचे कामा अद्याप सुरू आहे. रत्नागिरी-नागपूर महामार्गावरील उमळवाड पूल नवव्या क्रमांकाचा असेल.