व्यवस्थापनकुशलतेचा नवा अध्याय : दिलीपतात्या पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:28 IST2021-08-26T04:28:26+5:302021-08-26T04:28:26+5:30
निर्णय कठोरता, संस्थात्मक हित, नवे प्रयोग, आधुनिकतेची कास धरत नियम व व्यवहारांची सांगड घालून नव्या व्यवस्थापन वैशिष्ट्यांनी सहकार क्षेत्राला ...

व्यवस्थापनकुशलतेचा नवा अध्याय : दिलीपतात्या पाटील
निर्णय कठोरता, संस्थात्मक हित, नवे प्रयोग, आधुनिकतेची कास धरत नियम व व्यवहारांची सांगड घालून नव्या व्यवस्थापन वैशिष्ट्यांनी सहकार क्षेत्राला नवा आयाम देण्याचे काम दिलीपतात्या पाटील यांच्या नेतृत्वाने केले. अनेक सहकारी संस्थांचा अनुभव गाठीशी असला तरी त्यांनी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष म्हणून केलेले कार्य बँकेच्या इतिहासात यशाचे नवे परिमाण म्हणून कोरले गेले आहे. त्याचा डंका केवळ जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात व देशातही वाजला.
समाजकारणासाठी संस्था उभारताना त्या उत्कृष्ट पद्धतीने चालायला हव्यात म्हणून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी काही मोजक्या माणसांकडे या संस्थांचे दोर दिले. या टीममध्ये सर्वांत प्रभावी नेतृत्व करीत मिळेल त्या संस्थांमध्ये व्यवस्थापनकुशलतेचा नवा अध्याय निर्माण करण्याचे काम दिलीपतात्या पाटील यांनी केले. जिल्हास्तरापासून राज्यस्तरावरील संस्थांचे नेतृत्व करण्याची संधी त्यांना मिळाली. नेत्यांचा विश्वास व पाठबळ हे भांडवल असल्यामुळे संस्था चालविताना त्यांना पूर्ण मोकळीक मिळाली. त्यामुळे त्यांनी चौफेर फटकेबाजी करीत सहकारी संस्थांना यशोशिखरावर नेण्याचे काम केले.
साडेसात हजार कोटी रुपये खेळते भांडवल असणाऱ्या एका मोठ्या बँकेच्या साडेसहा वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी केलेले काम शुभ्रतेचे प्रतीक म्हणावे लागेल.
राष्ट्रीय तपास संस्थांच्या केवळ पत्राने अनेक दिग्गज संस्थाचालक व नेत्यांची भंबेरी उडत असताना ‘कर नाही, त्याला डर कसली’ या तत्त्वाने दिलीपतात्या पाटील यांनी देशातील सर्व वरिष्ठ तपास संस्थांच्या चौकशीचा सामना केला. एक पैशाचाही ठपका त्यांच्यावर बसला नाही. इतक्या मोठ्या प्रमाणावर तपास संस्था येऊनही त्यांच्या पदरी अपयश पडल्याची ही एकमेव घटना असावी. म्हणजे आपल्या कार्यकुशलतेने त्यांनी या तपास संस्थांवरही मात केल्याचे स्पष्ट होते.
सहकार क्षेत्राला मजबुतीचा त्यांनी दिलेला मंत्र राज्यस्तरावरील अनेक संस्थांच्या नेतृत्वांना, अधिकाऱ्यांना व सहकार क्षेत्रातील तज्ज्ञांनाही भावला. त्यामुळे पुरस्कार, सत्कार, कौतुकाच्या वर्षावात त्यांना त्याचे प्रमाणपत्रही लाभले.
काही काळात आर्थिकदृष्ट्या अडचणीत आलेली जिल्हा बँक प्रशासकांनी उत्तमरीत्या चालविली होती. मात्र पुन्हा संचालक मंडळाकडे बँकेची सूत्रे जाताना शंका-कुशंकांचे ढग दाटले होते. बँकेचे अध्यक्ष म्हणून धुरा सांभाळताना दिलीपतात्यांनी साडेसहा वर्षांच्या काळात प्रशासकांपेक्षाही अधिक प्रभावी, यशस्वी काम करीत बँकेला राज्यातील सर्वाधिक नफा मिळविणाऱ्या बँकांत अग्रभागी नेले. ही किमया आजवरच्या अध्यक्षांमध्ये काही मोजक्याच लोकांना जमली. राज्यस्तरावरील संस्थेत काम करून राज्यस्तरावर ठसा उमटविण्यापेक्षाही जिल्हास्तरावर काम करून राज्यस्तरावर त्याचा ठसा उमटविण्याची किमया ही सर्वांत अवघड असते. हे कामही दिलीपतात्यांनी करून दाखविले.
महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष असताना पदाच्या सलग पाच वर्षांच्या कार्यकालामध्ये वस्त्रोद्योगाला चालना देऊन राज्यातील अनेक सूतगिरण्यांच्या उभारणीत त्यांनी सहभाग घेतला आणि जुन्या सूतगिरण्यांना आधुनिकीकरणाची जोड देऊन नवे प्रकल्प उभारण्यास मदत केली. राज्यातील सहकारी सूत गिरण्या आर्थिकदृष्ट्या अडचणीत असतानाही उत्कृष्ट नियोजन आणि आर्थिक शिस्त या बळावर राजारामबापू वस्त्रोद्योग संकुल राज्यात आदर्शवत चालविण्याचे काम त्यांनी केले. सुतापासून ते रेडीमेड गारमेंटपर्यंत एकाच ठिकाणी प्रकल्प उभा करून हजारो गरीब व होतकरू स्त्री-पुरुषांना रोजगार उपलब्ध करून दिला. हा देशातील खासगी व सहकारी क्षेत्रांतील एकमेव प्रकल्प आहे. या वस्त्रोद्योग संकुलाला उत्कृष्ट नियोजनाचे विविध पुरस्कारही मिळाले आहेत.
सहकार क्षेत्रातील तब्बल ४५ वर्षांची त्यांची कारकिर्द अशाच वैशिष्ट्यांनी सजली आहे. मिळेल त्या संस्थेचे सोने करण्याचा परीसगुण त्यांना प्राप्त झाल्याचे वाटते. याची कल्पना असल्यानेच जयंत पाटील यांच्याकडून महत्त्वाच्या पदांची जबाबदारी त्यांच्याकडे सोपविली जात असावी.
साखर, वस्त्रोद्योग, पाणीपुरवठा, दूध, शेतीमाल प्रक्रिया, शिक्षण, सांस्कृतिक, बँकिंग अशा अनेक प्रकारच्या सहकारी व खासगी संस्थांचे त्यांनी नेतृत्व केले. संबंधित क्षेत्राचे ज्ञान असो अथवा नसो; ते अनुभवाने अवगत करीत कार्यकुशलता दाखविण्याची किमया त्यांनी साधली. राजकारणातही महत्त्वाच्या पदांवर काम करीत त्यांनी त्यांच्यातील संघटनकौशल्याच्या जोरावर नेत्यांच्या यशाला झळाळी आणण्याचे काम केले. २५ हून अधिक देशांचे दौरे, २५ हून अधिक संस्थांचे नेतृत्व, डझनभर पक्षीय पदांचा अनुभव घेत त्यांची कारकिर्द बहरली. त्याचा दरवळ आता सर्वदूर पोहोचला आहे.