सांगली ‘सिव्हील’साठी १०० खाटांची नवी इमारत मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:51 IST2021-03-04T04:51:12+5:302021-03-04T04:51:12+5:30

सांगली : येथील वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय (सिव्हील) येथे महिला व बालरुग्णांसाठी शंभर खाटांची स्वतंत्र इमारत मंजूर झाली आहे. ...

New 100-bed building approved for Sangli Civil | सांगली ‘सिव्हील’साठी १०० खाटांची नवी इमारत मंजूर

सांगली ‘सिव्हील’साठी १०० खाटांची नवी इमारत मंजूर

सांगली : येथील वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय (सिव्हील) येथे महिला व बालरुग्णांसाठी शंभर खाटांची स्वतंत्र इमारत मंजूर झाली आहे. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानमधून ३२ कोटी ४४ लाखांचा निधी यासाठी मंजूर झाल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.

सांगली जिल्ह्यासह कोल्हापूर व कर्नाटकच्या सीमावर्ती भागासाठी हे शासकीय रुग्णालय म्हणजे मोठा आधार आहे. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी सुमारे ३० एकरची प्रशस्त जागा असलेल्या या रुग्णालयाला ५० वर्षे पूर्ण झाली आहेत. या रुग्णालयात दिवसभरात सरासरी २० ते २५ मोठ्या आणि ४० ते ५० छोट्या स्वरूपाच्या शस्त्रक्रिया होत असतात. बाह्यरुग्ण विभागात १०० ते १,५०० तर आंतररुग्ण विभागात सरासरी पाचशेवर रुग्ण उपचार घेत असतात.

विस्ताराची योजना

शंभर खाटांच्या महिला आणि बालरुग्णालयाच्या इमारतीसाठीचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला होता. यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी प्रयत्न केले होते. आताच्या इमारतीशेजारीच महिला व बालरुग्णालयाची शंभर खाटांची स्वतंत्र इमारत मंजूर झाली आहे. यासाठी राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानामधून ३२ कोटी ४४ लाख रुपयांचा निधी मंजूर आहे. या रुग्णालयामध्ये अत्याधुनिक सुविधा देण्यात येतील, अशी माहिती डुडी यांनी दिली.

चौकट

पाठपुराव्याचे फलित

सांगली ‘सिव्हील’साठी २०१३पासून शंभर खाटांच्या रुग्णालय मंजुरीचा प्रश्न लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांच्या चर्चेत होता. प्रत्यक्षात या प्रस्तावाला गतीच मिळाली नव्हती. मुख्य कार्यकारी अधिकारी डुडी आणि डॉ. साळुंखे यांना कोरोना कालावधीमध्ये महिला व बालरुग्णालयाच्या स्वतंत्र इमारतीची गरज लक्षात आली. त्यांनी तसा प्रस्ताव राज्याव्दारे केंद्र शासनाकडे दिला होता.

Web Title: New 100-bed building approved for Sangli Civil