‘मोक्ष’ संकल्पनेत न गुरफटता देहदान आवश्यक

By Admin | Updated: April 3, 2015 00:36 IST2015-04-02T23:44:24+5:302015-04-03T00:36:21+5:30

सतीश डोडिया यांचे मत

Needless to give birth to a 'salvation' concept | ‘मोक्ष’ संकल्पनेत न गुरफटता देहदान आवश्यक

‘मोक्ष’ संकल्पनेत न गुरफटता देहदान आवश्यक

सध्या प्रत्येकजण स्वकेंद्रित जीवन जगत आहे. साहजिकच कित्येकांच्या जीवनातून ‘दान’ ही संकल्पना हद्दपार झालेली आहे. अशा पार्श्वभूमीवर नागरिकांच्या मनात दानाचे महत्त्व रुजवून त्यांना देहदान, रक्तदान आणि नेत्रदानाला प्रवृत्त करणे म्हणजे शिवधनुष्य उचलण्यासारखेच आहे. आजही भारतीयांच्या मनात पूर्वपरंपरेनुसार चालत आलेल्या रूढींचा पगडा आहे. देहदान केले, तर मोक्ष मिळतो का? रक्तदान करणे शरीरास लाभदायक आहे का? नेत्रदानाची खरंच गरज आहे का? यासह विविध विषयांवर अमित डोडिया प्रतिष्ठानचे सतीश डोडिया यांच्याशी साधलेला हा थेट संवाद...

भारतीय संस्कृतीत ‘दान’ या संकल्पनेचे काय महत्त्व आहे?
- ‘दान’ या संकल्पनेला आपल्याकडे अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. परंतु दान करताना डाव्या हाताचे उजव्या हाताला कळता कामा नये, असा संकेत आहे. यामागे दान करणाऱ्या व्यक्तीच्या मनात अहंकार निर्माण होऊ नये, हा विचार आहे. कालानुरूप दानाच्या परिभाषेत बदल होत गेला. विज्ञान युगात देहदान, नेत्रदान आणि रक्तदान यांना महत्त्व आले आहे. विविध सामाजिक संघटनांच्या जागृतीमुळे दानाच्या या तीनही प्रकारात नागरिकांचा सहभाग वाढत आहे.
एकवीसाव्या शतकातदेखील देहदानाबाबत नागरिकांच्या मनात गैरसमज आहेत का ?
- दुर्दैवाने गैरसमज आहेत. आजही कित्येक शिक्षित लोकदेखील मोक्ष, मुक्ती, आत्मा या मूर्खपणाच्या परिघात फिरत आहेत. कोणाला देहदानाविषयी माहिती सांगायला गेले की, त्यांचा पहिला प्रश्न असतो, अंत्यविधी नाही केला तर संबंधित व्यक्तीचा आत्मा इतरत्र भटकत राहील. त्यामुळे त्याला मोक्ष प्राप्त होणार नाही. वास्तविक आपण विज्ञान युगात वावरत आहोत. त्यामुळे हे निरर्थक विचार फेकून दिले पाहिजेत. यासाठी विविध सामाजिक संघटनांनी समाजजाणीव जागृत करण्याची आवश्यकता आहे. आज परदेशात देहदानाकडे कल वाढत चालला आहे. व्यक्ती गेल्यानंतर तिच्या शरीराचा उपयोग जर इतरांना होत असेल, तर देहदान करायला काय हरकत आहे? हा विचार आपल्याकडे रुजायला हवा.
देहदानाची खरंच गरज आहे का आणि कोणत्या व्यक्तीचे देहदान स्वीकारले जाते?
- शरीरशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी व्यक्तीच्या शरीराचे ज्ञान प्राप्त करणे आवश्यक असते. साहजिकच कोणी देहदान केले, तर त्याचा विद्यार्थ्यांना लाभ होतो. कोणताही आजार नसलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याचे देहदान स्वीकारले जाते. परंतु त्या देहाचा उपयोग प्रत्यारोपणासाठी होत नाही. याउलट वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ‘ब्रेन डेथ’ घोषित केलेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांनी भावनेच्या मायाजालात न गुरफटता वैद्यकीय सल्ल्यानुसार संबंधित व्यक्तीला लावलेला कृत्रिम आॅक्सिजनचा पुरवठा काढून देहदानासाठी पुढाकार घेतला पाहिजे. असे केले तर त्यांचे सर्व अवयव दुसऱ्यांच्या उपयोगी येऊ शकतात. सांगली जिल्ह्याचा विचार केल्यास मागील सात वर्षांत ५० हून अधिक जणांनी देहदान केलेले आहे, तर यंदा सुमारे ३५० जणांनी देहदान करण्याचा संकल्प केलेला आहे. जनस्वास्थ्य परिवारातर्फे देहदानाबाबत जागृतीची मोहीम सुरू आहे.
नेत्रदानाची चळवळ उभी राहावी यासाठी काय करता येईल?
- सामाजिक संघटना त्यांच्यापरीने प्रयत्न करीत आहेत. परंतु शहर स्तरावर विचार केला तर, महापालिकेने यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. अंत्यविधी साहित्य मोफत मिळण्यासाठी मनपातर्फे जो पास देण्यात येतो, त्याच्यामागे नेत्रदानाचे आवाहन करण्यात आलेले आहे. परंतु ते कितीजण गांभीर्याने घेतात, हा प्रश्नच आहे. सध्या मनपाची आर्थिक स्थितीही गंभीर आहे. प्रत्येक वर्षी नागरिकांच्या अंत्यविधीवर मनपाचे लाखो रुपये खर्च होत आहेत. त्यामुळे मनपाने अंत्यविधी हा सशुल्क करणे आवश्यक आहे. जे नेत्रदान करतील, त्यांना अंत्यविधी खर्चात ५० टक्के सवलत आणि मृत व्यक्तीच्या नातेवाईकांनी रक्षाविसर्जन नदीत न करता झाडाच्या बुंध्यात केल्यास अशा व्यक्तींच्या अंत्यविधीचा खर्च मनपाने करणे योग्य आहे. यामुळे नेत्रदानामध्येही वाढ होईल आणि रक्षाविसर्जनामुळे होणारे नदी प्रदूषण देखील कमी होईल.
जिल्ह्यातील नेत्रदानाची काय स्थिती आहे ?
- सध्या नेत्रपटल खराब असणाऱ्या ७५० व्यक्तींना नेत्रदानाची गरज आहे. जिल्ह्यात पाच नेत्रपेढ्या आहेत. गैरसमजुतीमुळे नेत्रदानाचे प्रमाण कमी आहे. महत्त्वाचे म्हणजे शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात नेत्रदानाचे प्रमाण वाढत आहे. एखाद्या व्यक्तीने नेत्रदानाचा संकल्प केलेला असतो, परंतु त्या व्यक्तीचे निधन झाल्यास ‘नेत्र’ काढण्यास कुटुंबीय विरोध करतात. यामुळे वादाचे प्रसंगही उद्भवतात. हा प्रश्न भावनिक असल्याने आम्हीही फार आग्रह करीत नाही. मुळात भारतातच प्रतिवर्षी केवळ १५ ते १७ हजार नेत्रदान होते. सव्वाशे कोटी लोकसंख्या असूनही आपण श्रीलंकेकडून ‘नेत्र’ आयात करतो.
रक्तदान केल्यास त्याचा आपल्या शरीराला काही लाभ होतो का ?
- रक्तदानामुळे दुसऱ्या व्यक्तीचे प्राण वाचतातच, परंतु तीन महिन्यांनी एकदा रक्तदान केल्यास आपले शरीर सुदृढ राहण्यास मदतच होते. किडनी आणि हृदयविकाराचे आजार देखील कमी होण्यास मदत होते. साहजिकच स्वत:च्या स्वार्थाकरिता तरी प्रत्येकाने रक्तदान करणे गरजेचे आहे.

                                                                                                                                                     नरेंद्र रानडे

Web Title: Needless to give birth to a 'salvation' concept

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.