दर्जेदार साहित्य निर्मितीची गरज
By Admin | Updated: December 26, 2014 00:09 IST2014-12-25T23:15:44+5:302014-12-26T00:09:19+5:30
साहित्यिकांचे साहित्य जरूर वाचावे. परंतु त्याचे अनुकरण मात्र करू नये.

दर्जेदार साहित्य निर्मितीची गरज
आळसंद : ग्रामीण भागातील साहित्यिकांनी शहरातील साहित्यिकांचे साहित्य जरूर वाचावे. परंतु त्याचे अनुकरण मात्र करू नये. दर्जेदार साहित्याची निर्मिती करायची असेल, तर साहित्यिकांनी स्वत:ला प्रकट करायला शिकले पाहिजे, असे मत ज्येष्ठ व पुरोगामी विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे यांनी व्यक्त केले.बलवडी (भा., ता. खानापूर) येथील ज्योतिर्लिंग साहित्य सेवा मंडळ व मारूती नाना पवार सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित २३ व्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनात डॉ. साळुंखे बोलत होते. ते म्हणाले की, प्रत्येक माणसाने आपले वेगळेपण प्रकट केले पाहिजे. जिज्ञासा ही माणसाच्या चांगुलपणाचे वैशिष्ट्य आहे. नवोदित साहित्यिकांनी ज्ञानाच्या कक्षा रूंदावण्यासाठी माणसांनी साहित्य वाचले पाहिजे. या परिसराने जगण्याची प्रेरणा दिली. नवा शब्द शिकणे म्हणजे नवा मित्र जोडणे होय. साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद तरूणांना दिले, तर नव्या बदलाचा वेध घेण्याचा प्रयत्न ते करतील.संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात ‘शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि ग्रामीण साहित्य’ या विषयावरील परिसंवादात प्रा. बाबूराव गुरव म्हणाले की, शेती पाण्याच्या प्रश्नावर दहापेक्षा ज्यादा कादंबऱ्या वाचावयास मिळत नाहीत, ही शोकांतिका असून, साहित्यिकांनी पाणीप्रश्नाबाबत गांभीर्याने घेण्याची गरज आहे. वेदना हा कलेचा आत्मा असून कलावंताकडे एक्स-रेसारखी नजर असली पाहिजे. शेतकऱ्याच्या हृदयात हात घालून साहित्य लिहिण्यासाठी ग्रामीण भागातील साहित्य संमेलनातून मोठे साहित्यिक निर्माण व्हावेत.
अॅड. के. डी. शिंदे यांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्यांबाबत चिंता व्यक्त केली. कविसंमेलनाचे अध्यक्षपद सौ. नंदिनी साळुंखे-पाटील यांनी भूषविले. सतीश लोखंडे यांनी प्रास्ताविक केले, तर दीपक पवार यांनी आभार मानले.
यावेळी भाई संपतराव पवार, सरपंच मनीषा दुपटे, अॅड. सुभाष पाटील, इंद्रजित देशमुख, अरविंद पत्की, प्रा. शामराव पाटील, उपसरपंच बापूसाहेब पवार, वसंत आपटे, अंधकवी चंद्रकांत देशमुखे, प्रा. विश्वनाथ गायकवाड, रघुराज मेटकरी, रघुनाथ पवार, आनंदराव पाटील, हेमंत पाटील उपस्थित होते. (वार्ताहर)
शेतकऱ्यांच्या समस्यांना वाचा फोडावी
‘शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि ग्रामीण साहित्य’ यावरील परिसंवादात प्रा. बाबूराव गुरव म्हणाले की, शेती पाण्याच्या प्रश्नावर दहापेक्षा जास्त कादंबऱ्या वाचावयास मिळत नाहीत, ही शोकांतिका आहे. साहित्यिकांनी पाणीप्रश्नाबाबत गांभीर्याने घेण्याची गरज आहे. त्यांच्या समस्यांना साहित्यातून वाचा फोडण्याची गरज आहे. शेतकऱ्याच्या हृदयात हात घालून साहित्य लिहिण्यासाठी ग्रामीण साहित्य संमेलनातून मोठे साहित्यिक निर्माण व्हावेत.