समाजाला नवसाहित्याची गरज
By Admin | Updated: July 27, 2014 00:31 IST2014-07-27T00:29:20+5:302014-07-27T00:31:26+5:30
भारत पाटणकर : ‘विद्रोही’ संमेलनाध्यक्षपदी निवड

समाजाला नवसाहित्याची गरज
सांगली : समाजात सांस्कृतिक प्रवाह असले, तरी आजच्या समाजाला नवसाहित्याची गरज असल्याचे मत कोल्हापूर येथे होणाऱ्या बाराव्या विद्रोही सांस्कृतिक साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी व्यक्त केले. विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्यावतीने प्रा. दादासाहेब ढेरे यांनी संमेलनाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल डॉ. पाटणकर यांचा सत्कार केला त्यानिमित्त ते पत्रकारांशी बोलत होते.
सध्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवर अरण्यरुदन करणाऱ्या बऱ्याच कादंबऱ्यांची निर्मिती होत असल्याचे सांगून डॉ. पाटणकर म्हणाले, परंतु या कादंबऱ्यांतून आत्महत्यांवर उपाय कोणता, याचे नेमके मार्गदर्शन होत नाही. यासाठीदेखील नवीन साहित्य निर्मिती गरज आहे. समाजातील तरुण पिढी पाश्चिमात्य नृत्य करीत आहे त्याला कोणतीही संघटना विरोध करीत नाही. परंतु पाश्चात्य व्हॅलेंटाईन डे ला मात्र विरोध होतो हे कशाचे लक्षण आहे. विद्रोही चळवळीमध्ये काही गट पडले आहेत. या सर्वांनी एकत्र आले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले. याप्रसंगी पार्थ पोळके, बाळासाहेब रास्ते, गणेश भिसे, किरण भिंगारदेवे उपस्थित होते. कोल्हापूर येथे २ आणि ३ आॅगस्ट रोजी हे संमेलन होणार आहे. (प्रतिनिधी)