भाजपला रोखण्यासाठी आघाडीची गरज : विश्वजित कदम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2018 00:14 IST2018-05-17T00:14:44+5:302018-05-17T00:14:44+5:30
सांगली : कर्नाटक विधानसभा निवडणुकीनंतर जातीयवादी भाजपला रोखण्यासाठी समविचारी पक्षांनी एकत्र येण्याची गरज आधोरेखित केली आहे

भाजपला रोखण्यासाठी आघाडीची गरज : विश्वजित कदम
सांगली : कर्नाटक विधानसभा निवडणुकीनंतर जातीयवादी भाजपला रोखण्यासाठी समविचारी पक्षांनी एकत्र येण्याची गरज आधोरेखित केली आहे. आगामी सांगली महापालिकेसाठी नेते व कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊनच आघाडीचा निर्णय घेतला जाईल, असे प्रतिपादन युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना केले. कर्नाटक विधानसभेच्या निकालाचा महापालिकेच्या निवडणुकीवर कसलाही परिणाम होणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
येथील कृष्णा घाटावर पद्मभूषण वसंतदादा पाटील यांच्या स्मारकाचे कदम यांनी दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत नगरसेवक राजेश नाईक, दिलीप पाटील, मंगेश चव्हाण, किशोर लाटणे, मयुर पाटील, प्रमोद सूर्यवंशी उपस्थित होते. यानंतर कदम यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
ते म्हणाले, कर्नाटकचा निकाल अनपेक्षित आहे. जातीयवादी भाजपला रोखण्यासाठी धर्मनिरपेक्ष व समविचारी पक्षांनी एकत्र आले पाहिजे, हेच या निकालावरून स्पष्ट होते. सांगली महापालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीसोबत आघाडी करण्याचा विचार पुढे येत आहे. पण काँग्रेसचे नेते व कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊनच आघाडीचा निर्णय होईल. सर्वप्रथम काँग्रेस कार्यकर्ते, नगरसेवकांशी चर्चा केली जाईल. त्यांच्या भावना पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचविल्या जातील. त्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष, आमदार जयंत पाटील यांच्याशी चर्चा होईल. आघाडीचा निर्णय हा सर्वस्वी कार्यकर्त्यांच्या चर्चेवर अवलंबून असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रवादी कॉँग्रेसबरोबर आघाडीबाबत विशाल पाटील यांनी व्यक्त केलेले मत वैयक्तिक असावे. काँग्रेस नेत्या जयश्रीताई पाटील, माजी मंत्री प्रतीक पाटील, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, महापालिकेचे महापौर व गटनेते यांच्यासह पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांना सोबत घेऊन ही निवडणूक काँग्रेस पक्ष ताकदीने लढवेल आणि महापालिकेवर काँग्रेसचाच झेंडा फडकेल, असेही कदम म्हणाले.पलूस- कडेगावची पोटनिवडणूक बिनविरोध केल्याबद्दल कदम यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजपच्या नेत्यांचे आभार मानले.
पलूस-कडेगाव मतदार संघातून बिनविरोध निवडून आल्यानंतर बुधवारी आमदार विश्वजित कदम यांनी सांगलीत वसंतदादांच्या स्मारकस्थळी अभिवादन केले. यावेळी आनंदराव मोहिते, जितेश कदम, राजेश नाईक उपस्थित होते.