भाजपच्या वाटेत... राष्ट्रवादीचे काटे; महायुतीत जागा वाटप ठरणार कळीचा मुद्दा, महाआघाडीचे लक्ष बंडखोरावर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2025 11:40 IST2025-12-20T11:39:14+5:302025-12-20T11:40:09+5:30
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह शहरातील दोन्ही आमदारांनी निवडणुकीची सुत्रे हाती घेतली आहेत.

भाजपच्या वाटेत... राष्ट्रवादीचे काटे; महायुतीत जागा वाटप ठरणार कळीचा मुद्दा, महाआघाडीचे लक्ष बंडखोरावर
शीतल पाटील
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजप व राष्ट्रवादी (अजित पवार गट) पक्षात मोठ्या प्रमाणात 'इनकमिंग' झाल्याने जागा वाटपाचा तिढा अधिक गुंतागुंतीचा झाला आहे. जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यावरच महायुतीचे भवितव्य अवलंबून आहे. दुसरीकडे गेल्या सहा महिन्यांत पक्षीय पातळीवर काँग्रेस व राष्ट्रवादी शरद पवार गटात मोठी पडझड झाली. त्यातून सावरत भाजप व महायुतीशी संघर्ष करण्याचे आव्हान महाआघाडीसमोर आहे.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह शहरातील दोन्ही आमदारांनी निवडणुकीची सुत्रे हाती घेतली आहेत. तर मविआच्यावतीने राष्ट्रवादीचे नेते आमदार जयंत पाटील, खासदार विशाल पाटील, आमदार विश्वजित कदम मैदानात उतरले आहेत. भाजप व राष्ट्रवादीला नव्या-जुन्यांचा मेळ घालण्याची कसरत करावी लागेल. महाआघाडीत निवडणुकीच्या हालचाली संथ आहेत. नेत्यांचाच मेळ लागत नसल्याने उमेदवारही संभ्रमात आहेत.
एकूण प्रभाग किती आहेत? - २०
एकूण सदस्य संख्या किती? - ७८
कोणते मुद्दे निर्णायक?
१. शहरातील गावठाण परिसरात कालबाह्य ड्रेनेज यंत्रणा, अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. प्रमुख रस्ते डांबरी असले तरी उपनगरात अंतर्गत रस्त्याची दुरावस्था झाली आहे.
२. शहरातील सांडपाणी वाहून नेणारा शेरीनाल्याचा प्रश्न गंभीर आहे. सांडपाणी थेट कृष्णा नदीपात्रात मिसळते.
३. क्रीडांगण, नाट्यगृह, भाजी 3 मंडईपासून नागरिक वर्षानुवर्षे वंचित आहेत. अतिक्रमणाचा प्रश्न आहे.
महापालिकेत गेल्या वेळी कुणाची होती सत्ता?
भाजप - ४१
शिवसेना - ००
राष्ट्रवादी काँग्रेस - १५
काँग्रेस - २०
मनसे - ००
इतर - ०२
मागील निवडणुकीत एकूण मतदार किती होते?
एकूण - ४,२३,३६६
पुरुष - २,१५,०८९
महिला - २,०८,२४०
इतर - ३७
आता एकूण किती मतदार ?
एकूण - ४,५४,४३०
पुरुष - २,२४,४८३
महिला - २,२९,८६५
इतर - ८२
बंडखोरीचे आव्हान
भाजप-राष्ट्रवादीत इच्छुक उमेदवारांची भाऊगर्दी आहे. भाजपमधील बंडखोरांना गळाला लावण्याची रणनिती महाआघाडीच्या नेत्यांनी आखली आहे.