राष्ट्रवादीचा विरोध : निधीचा परस्पर विनियोग केल्याचा आरोप
By Admin | Updated: September 1, 2015 22:15 IST2015-09-01T22:15:24+5:302015-09-01T22:15:24+5:30
सदस्यांनी सूचना देऊन काही योजनांना जादा निधी मिळू शकला असता. पण सत्ताधाऱ्यांतील दोन-चार नगरसेवक ठरवितात, त्यानुसार कामे होत आहेत, अशी टीकाही केली

राष्ट्रवादीचा विरोध : निधीचा परस्पर विनियोग केल्याचा आरोप
सांगली : राज्य शासनाने चौदाव्या वित्त आयोगातून महापालिकेला दिलेल्या १४ कोटी ४६ लाख रुपयांच्या निधीची सत्ताधारी गटाने परस्परच विल्हेवाट लावली आहे. गेल्या महिन्यातील महासभेत महापौर विवेक कांबळे यांनी ऐनवेळी निधी खर्चाचा ठराव घुसडल्याचा आरोप राष्ट्रवादीचेनगरसेवक विष्णू माने यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना केला. पुढील महासभेत इतिवृत्त मंजुरीला विरोध करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. माने म्हणाले की, महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट आहे. अशा स्थितीत शासकीय निधीचे वाटप करताना सदस्यांना विश्वासात घेण्याची गरज होती. पण महापौरांनी ऐनवेळी कोणताही विषय नसल्याचे सांगून सदस्यांची दिशाभूल केली आहे. गत महासभेत ऐनवेळी १४ व्या वित्त आयोगातून प्राप्त १४ कोटीचा निधी विविध विभागाकडे वर्ग करण्यात आला आहे. या ठरावावर महासभेत कोणतीही चर्चा झालेली नाही. या विषयाचे विषयपत्र १४ आॅगस्ट रोजीच महापौरांना प्राप्त झाले होते. महासभेत या विषयावर चर्चा होऊ शकली असती. पण पारदर्शी कारभाराच्या गप्पा मारणाऱ्या महापौरांनी ऐनवेळी ठराव घुसडून, त्यांच्या कारभाराची प्रचिती दिली आहे. सत्ताधाऱ्यांकडून बेकायदेशीररित्या निधी खर्च केला जात आहे. पाणीपुरवठा विभागाला केवळ एक कोटी रुपये दिले आहेत. वस्तुत: पाणी योजनेच्या कामाला तीन कोटीचा निधी अपेक्षित होता. माळबंगल्यावरील ७० एमएलडी जलशुद्धीकरण केंद्राचे काम अपूर्ण आहे. शहरातील नागरिकांना अपुरा पाणीपुरवठा होत आहे. अशा स्थितीत चर्चा झाली असती, तर सदस्यांनी सूचना देऊन काही योजनांना जादा निधी मिळू शकला असता. पण सत्ताधाऱ्यांतील दोन-चार नगरसेवक ठरवितात, त्यानुसार कामे होत आहेत, अशी टीकाही केली. (प्रतिनिधी)
निधीचा विनियोग...
घनकचरा व्यवस्थापन : ६.५१ कोटी
वैयक्तिक शौचालय मनपा हिस्सा : १.५९ कोटी
नागरी वनीकरण : ७२.३५ लाख
नगरोत्थान योजना मनपा हिस्सा : १ कोटी
पायाभूत सुविधा : ६३ लाख
पाणी योजना : १ कोटी
घरकुल योजना : ३ कोटी