इस्लामपूर शहरात राष्ट्रवादी देणार सांघिक नेतृत्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:28 IST2021-04-09T04:28:45+5:302021-04-09T04:28:45+5:30

अशोक पाटील लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूूर : इस्लामपूूर शहरात राष्ट्रवादीकडे एकमुखी नेतृत्व राहिलेले नाही. सध्या जलसंपदा मंत्री जयंत पाटील ...

NCP will provide team leadership in Islampur city | इस्लामपूर शहरात राष्ट्रवादी देणार सांघिक नेतृत्व

इस्लामपूर शहरात राष्ट्रवादी देणार सांघिक नेतृत्व

अशोक पाटील

लोकमत न्यूज नेटवर्क

इस्लामपूूर : इस्लामपूूर शहरात राष्ट्रवादीकडे एकमुखी नेतृत्व राहिलेले नाही. सध्या जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या अनुपस्थितीत त्यांचे पुत्र प्रतीक पाटील बैठका, कार्यक्रमांना हजेरी लावतात. पक्षात अनेक उपगट तयार झाले असून, तरुण कार्यकर्त्यात नाराजी आहे. त्यामुळे सांघिक नेतृत्व पुढे येण्याची शक्यता असून, जयंत पाटील यांचे नेतृत्व मानणारी युवकांची फळी नगरपालिका निवडणुकीत उतरण्याच्या तयारीत आहे.

जयंत पाटील गटाने इस्लामपूर पालिकेवर तीस वर्षांहून अधिक काळ सत्ता गाजविली. त्यातही बराच काळ दिवंगत विजयभाऊ पाटील यांचेच वर्चस्व होते. त्यावेळी पक्षामध्येच तीन-तीन गट कार्यरत होते. त्यापैकी चिमण डांगे यांनी विजयभाऊ पाटील यांच्याशी जवळीक साधून स्वत:चा गट अबाधित ठेवला. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष शहाजी पाटील हे विजयभाऊंच्या घराण्यातील असून, तेच त्यांचे राजकीय वारसदार असल्याचे बोलले जाते. अडसर असतानाही त्यांनी स्वबळावर पालिकेच्या राजकारणात पाय रोवले आहेत. पालिकेच्या राजकारणात एनए ग्रुपचा दबदबा संपुष्टात आल्यानंतर या ग्रुपमधून बाहेर पडलेल्या खंडेराव जाधव यांनी पुन्हा तरुणांची जुळवाजुळव सुरू केली आहे. हे तिन्ही नेते आता युवा नेते प्रतीक पाटील यांच्यासोबत असतात. ते त्यांना शहरातील राजकारणाची माहिती देत असतात. पुढील काळात शहराची जबाबदारी या सर्वांवर दिली जाण्याची शक्यता असून, सांघिक नेतृत्व तयार होणार आहे.

कोट

माझ्यावर शहरातील राष्ट्रवादीची जबाबदारी आहे. सर्वांनाच बरोबर घेऊन जाणे, माझे काम आहे. जयंत पाटील यांचे नेतृत्व आम्ही मानतो. येथून पुढेही त्यांचेच मार्गदर्शन घेत वाटचाल करू.

- शहाजी पाटील, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी कॉँग्रेस

चौकट

निवडणुकीची खलबत्ते

नगरपालिकेच्या प्रत्येक निवडणुकीत उमेदवारी ठरवण्यासाठी जयंत पाटील यांचे स्नेही, उद्योजक सुरेंद्र पाटील यांच्या बसस्थानक परिसरातील निवासस्थानी खलबत्ते होत असत. यावेळी ते केंद्र बदलेल, असे बोलले जाते.

Web Title: NCP will provide team leadership in Islampur city