वसंतदादांच्या नावाची राष्ट्रवादीला ॲलर्जी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:29 IST2021-09-22T04:29:58+5:302021-09-22T04:29:58+5:30
सांगली : काँग्रेसच्या पाठिंब्यामुळे राष्ट्रवादीला महापालिकेचे महापौरपद मिळाले; पण त्याच राष्ट्रवादीला माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या नावाची ॲलर्जी झाली ...

वसंतदादांच्या नावाची राष्ट्रवादीला ॲलर्जी
सांगली : काँग्रेसच्या पाठिंब्यामुळे राष्ट्रवादीला महापालिकेचे महापौरपद मिळाले; पण त्याच राष्ट्रवादीला माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या नावाची ॲलर्जी झाली आहे. वसंतदादांच्या स्मारकाच्या देखभाल दुरुस्तीसाठी एक कोटीच्या निधीची तरतूद अंदाजपत्रकात करण्याची हमी महापौरांनी दिली होती. पण केवळ दहा लाख रुपयांची तरतूद करून महापौरांनी थट्टा केल्याचा घणाघात उपमहापौर उमेश पाटील यांनी मंगळवारी केला. त्यामुळे अंदाजपत्रकातील निधी वाटपावरून काँग्रेस-राष्ट्रवादीतही कलगीतुरा रंगण्याची चिन्हे आहेत.
पाटील म्हणाले की, महापुरामुळे वसंतदादा स्मारकस्थळाचे नुकसान झाले आहे. स्मारकातील पेव्हिंग ब्लाॅक उखडले आहेत. लोखंडी ग्रीलही खराब झाले आहे. प्रकाशबापूंच्या स्मारकाजवळील कंपाऊंड भिंतीचे नुकसान झाले आहे. पार्किंगच्या जागाही विकसित करण्याची आहे. लाॅनही खराब झाले आहे. या साऱ्या कामांसाठी १ कोटी रुपयांचा निधी द्यावा, असे पत्र महापौरांना दिले होते. त्यांनीही ते मान्य केले होते. पण प्रत्यक्षात अंदाजपत्रकात केवळ १० लाखांचा निधीची तरतूद केली आहे. यावरून वसंतदादांच्या नावाची राष्ट्रवादीसह महापौरांनाही ॲलर्जी असल्याचे दिसून येते.
दिवगंत मदनभाऊ पाटील यांच्या नावाने राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा भरविल्या जातात. त्यासाठी महापालिकेकडून २५ लाखांची तरतूद होते. अगदी भाजप सत्ताकाळातही निधीमध्ये कपात झाली नव्हती. पण राष्ट्रवादीने मात्र या स्पर्धांसाठी १० लाखांचीच तरतूद करून पाने पुसण्याचा उद्योग केला आहे. काँग्रेसच्या पाठिंब्यामुळे राष्ट्रवादीचा महापौर होऊ शकला, याचा विसर पडल्याचे दिसून येते. त्यापेक्षा विरोधात असतो तर बरे झाले असते, असा टोलाही पाटील यांनी लगाविला.
चौकट
राजारामबापू उद्यानासाठी ७३ लाख
वसंतदादा पाटील यांच्या स्मारकस्थळाच्या विकासासाठी राष्ट्रवादी व महापौरांनी निधीची कात्री लावली. त्याच वेळी महापौरांच्या वार्डात राजारामबापू पाटील यांच्या नावाने उद्यान उभारण्यासाठी मात्र ७३ लाखांची तरतूद अंदाजपत्रकात केली आहे. त्याला आमचा विरोध नाही; पण वसंतदादांच्या स्फूर्तिस्थळासाठी निधीची तरतूद करण्याची गरज होती, असेही पाटील म्हणाले.