तासगावात राष्ट्रवादीतर्फे संजय सावंत
By Admin | Updated: October 28, 2016 23:59 IST2016-10-28T23:59:21+5:302016-10-28T23:59:21+5:30
नगराध्यक्ष निवडणूक : आज शिक्कामोर्तब; भाजपकडून मोहन कांबळे ?; काँग्रेसकडून शिवाजी शिंंदे

तासगावात राष्ट्रवादीतर्फे संजय सावंत
दत्ता पाटील ल्ल तासगाव
तासगाव नगरपालिकेत थेट नगराध्यक्ष निवडीसाठी राष्ट्रवादीकडून नवा चेहरा पुढे आणण्यात आला आहे. अॅड. संजय सावंत यांनी शुक्रवारी शक्तिप्रदर्शन करुन अर्ज दाखल केला असून, त्यांचेच नाव निश्चित होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. भाजपकडून माजी नगरसेवक मोहन कांबळे यांचे नाव आघाडीवर आहे. मात्र ऐनवेळी नवा चेहरा देण्यासाठीदेखील फिल्डिंग लावली आहे. काँग्रेसकडून शिवाजी शिंदे यांचे नाव निश्चित मानले जात असून शनिवारी पक्षाच्या एबी फॉर्म वाटपानंतरच यावर शिक्कामोर्तब होणार आहे.
तासगाव नगरपालिकेसाठी यावेळी नगराध्यक्ष पदासाठीची निवडणूक थेट लोकांतून होत आहे. ही निवड पाच वर्षासाठी राहणार आहे. शहराच्या विकासासाठी नगराध्यक्षपद निर्णायक ठरणार आहे. किंंबहुना या निवडणुकीत नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीवर पक्षाच्या पॅनलचे भवितव्यही अवलंबून राहणार आहे. तासगावकरांच्या पसंतीस उतरणारा उमेदवार असावा, यासाठी भाजप, राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडूनही यंत्रणा राबवली गेली. राष्ट्रवादीकडून नगराध्यक्ष पदासाठी आठ ते दहा इच्छुकांनी मुलाखती दिल्या होत्या. मात्र ऐनवेळी राष्ट्रवादीने नगराध्यक्ष पदासाठी नवा चेहरा समोर आणला आहे. अॅड. संजय सावंत यांनी शुक्रवारी मोठे शक्तिप्रदर्शन करीत अर्ज दाखल केला आहे. अॅड. सावंत यांची राजकीय पाटी कोरी असल्याने, राष्ट्रवादीकडून त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले जाण्याची दाट शक्यता आहे.
राष्ट्रवादीकडून नवा चेहरा समोर आल्याने भाजपसमोर आव्हान निर्माण झाले आहे. भाजपकडून नगराध्यक्ष पदासाठी काही अर्ज दाखल झाले आहेत. माजी नगरसेवक मोहन कांबळे यांनीही शुक्रवारी मोठे शक्तिप्रदर्शन करुन अर्ज दाखल केला आहे. मोहन कांबळे यांनी नगरसेवक म्हणून काम केल्याचा अनुभव आहे. किंबहुना नगराध्यक्ष पदाच्या रिंगणात उतरण्यासाठी त्यांनी जोरदार तयारीदेखील सुरु केली आहे. त्यामुळे भाजपकडून त्यांचेच नाव अंतिम मानले जात आहे.
मात्र ऐनवेळी नवा चेहरा देण्यासाठीदेखील भाजपमध्ये हालचाली सुरु असल्याची चर्चा आहे. काँग्रेसनेही थेट नगराध्यक्ष निवडीसाठी कंबर कसली असून शिवाजी शिंंदे यांनी नगराध्यक्ष पदासाठी काँग्रेसकडून अर्ज दाखल केला आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये आघाडीबाबत चर्चा सुरु आहे. आघाडी होऊन नगराध्यक्षपद राष्ट्रवादीकडे गेल्यास, हा अर्ज मागे घेतला जाऊ शकतो.
अन्यथा शिवाजी शिंंदे काँग्रेसच्या माध्यमातून नगराध्यक्ष पदाच्या रिंगणात कायम राहणार हे निश्चित आहे. शनिवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत आहे. पक्षाचे अधिकृत एबी फॉर्मही शनिवारीच जोडण्यात येणार आहेत. याचवेळी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांवर अधिकृत शिक्कामोर्तब होणार आहे.
भाजपकडून नव्या चेहऱ्यासाठी चाचपणी?
भाजपकडून माजी नगरसेवक मोहन कांबळे यांचे नाव आघाडीवर आहे. राष्ट्रवादीने अॅड. संजय सावंत यांच्या माध्यमातून नवा चेहरा समोर केला आहे. त्यामुळे भाजपकडूनही नवा चेहरा समोर आणण्यासाठी हालचाली सुरु असल्याची चर्चा आहे. अॅड. सावंत यांच्यासाठीदेखील भाजपच्या काही कारभाऱ्यांनी गळ टाकल्याची चर्चा होती. तसेच आता अॅड. सावंत यांच्या घरातच उमेदवारी देऊन राष्ट्रवादीला शह देण्यासाठी भाजपकडून चाचपणी सुरु असल्याची चर्चा आहे. मात्र याबाबतचे नेमके चित्र शनिवारी दुपारपर्यंत स्पष्ट होणार आहे