बुधगावात ‘नगरभूमापन’ला ठोकले टाळे
By Admin | Updated: July 31, 2014 23:24 IST2014-07-31T23:12:00+5:302014-07-31T23:24:34+5:30
ग्रामस्थांचे आंदोलन : सावळागोंधळ थांबविण्याची मागणी

बुधगावात ‘नगरभूमापन’ला ठोकले टाळे
बुधगाव : येथील नगरभूमापन कार्यालयातील सावळागोंधळ थांबवावा व बेकायदा केलेल्या नोंदी रद्द कराव्यात, ग्रामपंचायत आराखड्यानुसार उपनगरांतील मालमत्तांच्या नोंदी कराव्यात आदी मागण्यांसाठी संतप्त ग्रामस्थ व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी नगरभूमापन कार्यालयास गुरुवारी टाळे ठोकून प्रशासनाचा निषेध केला.
उपनगरांतील जमिनीतून प्लॉटविक्री केली होती. परंतु भूमापन कार्यालयाकडे नोंदीसाठी मालमत्ताधारक गेल्यानंतर वारसांची लेखी संमतीपत्रे आणावीत, अशी मागणी करीत हे अधिकारी नोंदी घालण्यास टाळाटाळ करीत आहेत. ग्रामपंचायत मालकीच्या खुल्या जागांना संस्थानिकांच्या वारसांच्या नोंदी तडजोडी करून केल्याचा आरोप करीत ग्रा. पं. सदस्य प्रशांत मोहिते, प्रवीण पाटील, अनिल डुबल, आनंदराव पाटील, राजेंद्र शिवकाळे आदींनी या नोंदी रद्द करून कारवाईची मागणी केली. यावेळी सरपंच सुजाता पाटील, उपसरपंच सुखदेव गोसावी आदी उपस्थित होते. (वार्ताहर)