शिराळ्यात रंगणार आज नागपंचमी उत्सव
By Admin | Updated: August 18, 2015 22:53 IST2015-08-18T22:53:10+5:302015-08-18T22:53:10+5:30
जिवंत नागांची पूजा : पोलीस, वन विभागाचे संचलन; ग्रामस्थांकडून जय्यत तयारी

शिराळ्यात रंगणार आज नागपंचमी उत्सव
शिराळा : येथील जगप्रसिद्ध नागपंचमी उत्सवासाठी प्रशासकीय यंत्रणेबरोबरच शिराळकर सज्ज झाले आहेत. बुधवारी होणाऱ्या नागपंचमी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी दुपारी शहरातून पोलीस व वन विभागाने संयुक्त संचलन केले. अंबामाता मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात मिठाई, फळे, खाद्यपदार्थ विक्रीचे स्टॉल तसेच मिनी एस्सेल वर्ल्ड दाखल झाले आहेत.
शिराळ्याची नागपंचमी २००२ पासून न्यायालयाच्या कक्षेत असून, यावर्षीही न्यायालयाच्या आदेशानुसार साजरी होत आहे. घरोघरी व नाग मंडळांमार्फत जिवंत नागांची पूजा करण्यात येणार आहे. मंगळवारी दुपारी एकच्या दरम्यान पोलीस उपअधीक्षक वैशाली शिंदे यांच्या नेतृत्वाखाली विभागीय वन अधिकारी एस. बी. चव्हाण, विभागीय वन अधिकारी डी. बी. शेंडगे, एस. डी. गवते, वनक्षेत्रपाल एस. के. कदम, पोलीस निरीक्षक अनिल गुजर, सहायक पोलीस निरीक्षक दिलीप वायकर आणि मोठ्या फौजफाट्यासह होळीचे टेक येथून गुरुवारपेठ, कुरणे गल्ली, सोमवार पेठ, अंबामाता मंदिर, एसटी बसस्थानक या मार्गावरून संचलन करण्यात आले.नागपंचमीदिवशी वन विभागाची १० गस्ती पथके, वन संरक्षक दर्जाचे सात, वन क्षेत्रपाल दर्जाचे तीन, वनपाल दर्जाचे नऊ, वन रक्षक दर्जाचे १६ अधिकारी, कायम वन मजूर १२ व अन्य असे ४७ वन अधिकारी, कर्मचाऱ्यांचे पथक तैनात करण्यात आले आहे. प्रत्येक पथकात सर्प हाताळणारा एक व दोन पोलीस कर्मचारी असतील. त्याशिवाय एक पोलीस उपअधीक्षक, १४ पोलीस निरीक्षक, २४ सहायक पोलीस निरीक्षक, ३८० पोलीस कर्मचारी, ध्वनिप्रदूषण कारवाई पथके, २५ वॉकीटॉकी सेट, दोन राखीव संरक्षक दल, गुन्हे अन्वेषण विभागाची सांगली, सातारा, कोल्हापूर येथील पथके असा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.
एसटी महामंडळामार्फत शिराळा आगाराच्या ९० एसटी बसेस, इतर आगाराच्या २५ एसटी बसेस भाविकांची ने-आण करण्यासाठी सज्ज आहेत. एसटी बसस्थानक, नाईक महाविद्यालय, गोरक्षनाथ फाटा, पाडळी नाका याठिकाणी बसथांबे आहेत.
नाग मंडळ जिल्हा मिरवणुकीसाठी वनक्षेत्रपाल दर्जाचे चार अधिकारी, वनपाल दर्जाचे ११ अधिकारी, वन संरक्षक दर्जाचे २३ अधिकारी व इतर असे १०१ अधिकारी व वन कर्मचाऱ्यांचे पथक आहे. त्याचबरोबर सर्पदंश प्रतिबंधक ७०० लसी शिराळा ग्रामीण रुग्णालयात उपलब्ध आहेत. सात आरोग्य पथके तयार ठेवण्यात येणार आहेत. संपूर्ण गावात स्वच्छता, डीटीटी पावडर फवारणी करण्यात आली आहे.
अंबामाता ट्रस्टमार्फत मंदिरात अंबामातादेवीचे दर्शन सुलभ व्हावे, यासाठी पुरुष, महिलांसाठी वेगळ्या रांगांची व्यवस्था करून बॅरिकेटस् लावण्यात आली आहेत. अंबामाता मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात मिठाई, खाद्यपदार्थ, खेळणी विक्रेते, कपडे, नारळ, विविध साहित्य विक्रेत्यांनी स्टॉलची उभारणी केली आहे. नाग स्टेडियमवर मिनी एस्सेल वर्ल्ड तसेच लहान मुलांच्या मनोरंजनाच्या साधनांनी गर्दी केली आहे. शहराच्या मुख्य मार्गावरही मोठ्या प्रमाणात विविध स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. या परिसरात पोलिसांनीही टॉवर उभारले आहेत. मिरवणुकीसाठी नाग मंडळांची बेंजो, वाजंत्री पथके दाखल होऊ लागली आहेत. (वार्ताहर)