बिळाशीत मुस्लिम युवकांनी केली गणेशाची प्रतिष्ठापना- हिंदू-मुस्लिम ऐक्याचा आदर्श : वाजत-गाजत काढली मिरवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2018 21:29 IST2018-09-13T21:26:40+5:302018-09-13T21:29:47+5:30
बिळाशी : बिळाशी (ता. शिराळा) येथील मुस्लिम युवक साहिल खुदबुद्दीन मुलाणी व शहारुख इब्राहीम मुलाणी यांनी घरी गणपतीची प्राणप्रतिष्ठापना करून हिंदू-मुस्लिम ऐक्याचा आदर्श घालून दिला आहे.

बिळाशीत मुस्लिम युवकांनी केली गणेशाची प्रतिष्ठापना- हिंदू-मुस्लिम ऐक्याचा आदर्श : वाजत-गाजत काढली मिरवणूक
बिळाशी : बिळाशी : बिळाशी (ता. शिराळा) येथील मुस्लिम युवक साहिल खुदबुद्दीन मुलाणी व शहारुख इब्राहीम मुलाणी यांनी घरी गणपतीची प्राणप्रतिष्ठापना करून हिंदू-मुस्लिम ऐक्याचा आदर्श घालून दिला आहे.
साहिल व त्याचे आजोबा अमिन मुलाणी व आजी दुल्हन मुलाणी यांचे गावाशी जिव्हाळ्याचे संबंध होते.
दसऱ्यावेळी व गावजत्रेवेळी अमिन यांची छडी ताशावर पडायची. भैरोबाच्या यात्रेत त्यांचे गुलाल, खोबरे, उदबत्तीचे दुकान देवाच्या दारात असतेच. लहानपणी साहिलने त्यांच्याकडे गणपती बसविण्याचा हट्ट केला. आजोबा व आजीने तो बालहट्ट आनंदाने पूर्ण केला. पांढरी शुभ्र विजार, शर्ट आणि डोक्यावर गांधी टोपी हयातभर घालणाºया अमिन यांची मशिदीवर जेवढी श्रद्धा, तेवढीच गणपती आणि ग्रामदैवत भैरवनाथावरही होती. आज ते हयात नाहीत, पण त्यांची प्रेमळ विचारधारा नातू चालवतो. साहिल रिक्षा चालवतो.
साहिलचे वडील खुदबुद्दीन व चुलते इब्राहीम बाजारात मिठाईचा व्यवसाय करतात व एरवी जनावरांचा व्यापार करतात. ते गणेश मंडळांमध्ये सक्रिय असतात. भंडाºयावेळी सढळ हाताने मदत करताना,जेवण वाढण्यापासून ते पत्रावळ्या उचलण्यापर्यंत कामे आनंदाने करतात. घरी दहा दिवस मांसाहार पूर्ण वर्ज्य असतो. हिंदू-मुस्लिम ऐक्याला सांधणाºया या घटना मनाला उभारी देतात.
हिंदू-मुस्लिम भाई-भाई!
बिळाशी बंडातही बापू हसन मुलाणी अग्रेसर होते. त्यांचे बंधू रसूल व बापू उत्तम तबलावादक होते. रहिमान मुलाणी, आप्पाभाई मुलाणी, बाळूभाई मुलाणी हेदेखील तबलावादनात निष्णात होते. गावात कोठेही भजन असेल, तर तेथे विनामोबदला श्रद्धेने सेवा करीत असत. नुकतेच काही वर्षापूर्वी बाळूभाई यांचे निधन झाले. त्यावेळी त्यांना टाळ-मृदंगाने शेवटचा निरोप दिला व भैरवनाथाच्या दारात शेवटचा कलाम त्यांच्यासाठी पढण्यात आला.