सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली

By घनशाम नवाथे | Updated: June 9, 2025 22:08 IST2025-06-09T20:41:11+5:302025-06-09T22:08:07+5:30

उपायुक्त वैभव साबळे याला ७ लाख रूपयांच्या लाचेच्या मागणीबद्दल अटक केल्यानंतर या कारवाईचे समाज माध्यमावरून स्वागत करण्यात आले.

Municipal Deputy Commissioner Vaibhav Sable arrested in Sangli; took bribe of Rs 7 lakh for construction permit of high-rise building | सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली

सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली

- घनशाम नवाथे

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : सांगलीत २४ मजली इमारतीचा बांधकाम परवाना मंजूर करण्यासाठी ७ लाखांची लाच मागितल्याबद्दल महापालिका उपायुक्त वैभव विजय साबळे (वय ३१, रा. ग्रीन एकर्स, फ्लॅट नं. ४०३, धामणी रस्ता, सांगली) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली. सोमवारी केलेल्या कारवाईनंतर महापालिका क्षेत्रात खळबळ उडाली.

तक्रारदार तानाजी रूईकर (रा. मिरज) यांच्या कंपनीने सांगलीतील सी.के. असोसिएटस् यांच्या २४ मजली इमारतीचा बांधकाम परवाना घेण्यासाठी महापालिकेत प्रस्ताव दिला होता. हा परवाना मंजूर करण्यासाठी उपायुक्त साबळे याने वरिष्ठांचे नाव सांगून १० लाख रूपये लाचेची मागणी केली. त्यामुळे रूईकर यांनी दि. १७ फेब्रुवारी २०२५ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाकडे तक्रार अर्ज केला. तक्रारीनुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पडताळणी केली. तेव्हा उपायुक्त साबळे याने तक्रारदार रूईकर यांच्याकडे बांधकाम परवाना मंजूर करण्यासाठी दहा लाख रूपये लाचेची मागणी करून तडजोडीअंती ७ लाख रूपये स्विकारण्यास तयार असल्याचे स्पष्ट झाले.

उपायुक्त साबळे याने ७ लाख रूपये लाचेची मागणी केली. परंतू त्यानंतर घडलेल्या घडामोडीनंतर प्रत्यक्षात ७ लाख रूपये लाच स्विकारली नाही. परंतू त्याने ७ लाखाची लाच मागितल्याचे पडताळणीत निष्पन्न झाल्यामुळे त्याच्याविरूद्ध कारवाईचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवण्यात आला.

दरम्यान वरिष्ठ कार्यालयाने पडताळणी केल्यानंतर उपायुक्त साबळे याच्याविरूद्ध कारवाई करण्याचा आदेश दिला. त्यानुसार नूतन उपअधीक्षक अनिल कटके यांच्या पथकाने सोमवारी सायंकाळी महापालिकेतून साबळे याला ताब्यात घेऊन अटक केली. त्याच्याविरूद्ध विश्रामबाग पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला. मंगळवारी त्याला न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे.

उपअधीक्षक कटके, निरीक्षक विनायक भिलारे, किशोरकुमार खाडे, अंमलदार प्रीतम चौगुले, अजित पाटील, सलिम मकानदार, ऋषिकेश बडणीकर, पाेपट पाटील, उमेश जाधव, रामहरी वाघमाेडे, सीमा माने, धनंजय खाडे, सुदर्शन पाटील, अतुल मोरे, चंद्रकांत जाधव, वीणा जाधव यांच्या पथकाने कारवाई केली.

कारवाईनंतर फटाके वाजवले
उपायुक्त वैभव साबळे याला ७ लाख रूपयांच्या लाचेच्या मागणीबद्दल अटक केल्यानंतर या कारवाईचे समाज माध्यमावरून स्वागत करण्यात आले. तर महापालिकेच्या मंगलधाम शॉपिंगसेंटरमधील कार्यालयासमोर काहींनी फटाके वाजवून आनंद व्यक्त केला.

सातारा, सांगलीतील घराची झडती
वैभव साबळे हा मुळचा सातारा येथील आहे. सध्या सांगलीत धामणी रस्ता येथे ग्रीन एकर्समध्ये राहत होता. लाचेच्या मागणीच्या कारवाईनंतर साबळे याच्या सातारा व सांगलीतील निवासस्थानी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सायंकाळी झडती घेतली.

वरिष्ठांसाठी मागितली लाच
उपायुक्त वैभव साबळे याने महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यास देण्यासाठी म्हणून लाचेची मागणी केली होती असे तक्रारीत म्हंटले आहे. पडताळणीत संबंधित अधिकाऱ्याने प्रत्यक्षात लाच मागितल्याचे निष्पन्न झाले नाही. त्यामुळे कारवाई झाली नाही. परंतू या वरिष्ठ अधिकाऱ्याची समाज माध्यमावर चर्चा मात्र रंगली होती.

मुंबईच्या पथकाची चर्चा
लाचलुचपत प्रतिबंधक विभागात मुंबईहून उपअधीक्षक अनिल कटके दाखल झाले आहे. गुरूवारी सांगलीत त्यांनी पदभार स्विकारला. त्यानंतर सोमवारी कारवाईचे आदेश आल्यामुळे ते सहभागी झाले. परंतू मुंबईच्या पथकाने कारवाई केल्याची चर्चा रंगली होती.

Web Title: Municipal Deputy Commissioner Vaibhav Sable arrested in Sangli; took bribe of Rs 7 lakh for construction permit of high-rise building

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.