संजयनगरमधील महापालिकेचे घरकुल ठरतेय गुन्हेगारांचा अड्डा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:42 IST2021-05-05T04:42:36+5:302021-05-05T04:42:36+5:30
संजयनगर : शहरातील प्रभाग ११ मधील डॉ. लिमये रस्त्यावरील महापालिकेची घरकुलाची इमारत गुन्हेगारांचा अड्डा बनत आहे. महापालिकेने सुमारे दोन ...

संजयनगरमधील महापालिकेचे घरकुल ठरतेय गुन्हेगारांचा अड्डा
संजयनगर : शहरातील प्रभाग ११ मधील डॉ. लिमये रस्त्यावरील महापालिकेची घरकुलाची इमारत गुन्हेगारांचा अड्डा बनत आहे. महापालिकेने सुमारे दोन कोटी रुपये खर्च करून ही इमारत बांधली; पण या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये अवैध धंदे सुरू आहेत. याकडे मात्र महापालिका प्रशासन लोकप्रतिनिधी आणि पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे. महापालिकेने याकडे लक्ष न दिल्यास महापालिकेवर आंदोलन करण्याचा इशारा आंतराष्ट्रीय मानवता अधिकार मीडिया एव संघटनेचे प्रभारी मिलिंद साबळे यांनी दिला आहे.
शहरातील संजयनगर येथे डॉ. लिमये रस्त्यावर महापालिकेने सुमारे दोन कोटी रुपये खर्च करून बांधलेल्या इमारतीची दुरवस्था झाली आहे. या ठिकाणी एकूण ५५ खाेल्या आहेत. परंतु, महापालिकेने वाटप न केल्याने या ठिकाणी अवैध धंदे सुरू झाले आहेत. या ठिकाणी दारूचा अड्डा व अवैध धंदे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. पूर्वी या ठिकाणी सुरक्षा रक्षक तैनात होता. तो ठेकेदाराने बंद केला आहे. यामुळे या घरकुलामध्ये अवैध व्यावसायिकांचा खुलेआम वावर सुरू झाला आहे. सर्वत्र घाणीचे साम्राज्य आहे. इमारतीला बसविण्यात आलेल्या प्लास्टिकच्या पाईपची मोडतोड झाली आहे. ठिकठिकाणी दारूच्या बाटल्या पडलेल्या दिसतात. गुन्हेगारी वृत्तीच्या लाेकांचा वावर वाढला आहे. दररोज एखाद्याला आणून या इमारतीत मारहाण केली जाते. तक्रारी नसल्याने पोलीसदेखील याकडे लक्ष देत नाहीत.
येथील अनागाेंदीबाबत नागरिकांनी महापालिका शहर अभियंत्यांकडे तक्रारी केल्या. तेही याकडे लक्ष देत नाहीत. आयुक्त नितीन कापडणीस यांनी या घरकुलाकडे लक्ष देणे गरजेचे आहे. संजयनगर पोलीस ठाण्याने येथील गुन्हेगारांचा बंदाेबस्त करावा, अशी मागणी हाेत आहे. महापालिकेने या इमारतीचे गरजूंना वाटप करावे. येथील अवैध व्यवसाय बंद करावेत. गाव गुंडांपासून नागरिकांचा होणारा त्रास कमी करावा. यासाठी पोलिसांनी पुढे यावे अशी मागणी मिलिंद साबळे यांनी केली आहे.
फोटो : ०३ दुपटे ८
ओळी : महानगरपालिकेने संजयनगर येथे बांधलेली घरकुलाची इमारत वापराविना पडून आहे. (छाया : सुरेंद्र दुपटे)