कोरोना मृतांच्या अंत्यसंस्कारासाठी पालिकेची ठेकेदारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:24 IST2021-05-01T04:24:54+5:302021-05-01T04:24:54+5:30
इस्लामपूर : इस्लामपूर शहरासह वाळवा तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या दरदिवशी वाढतच आहे. या वाढत्या रुग्णसंख्येवरूनच मृतांचा आकडाही तितकाच ...

कोरोना मृतांच्या अंत्यसंस्कारासाठी पालिकेची ठेकेदारी
इस्लामपूर : इस्लामपूर शहरासह वाळवा तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या दरदिवशी वाढतच आहे. या वाढत्या रुग्णसंख्येवरूनच मृतांचा आकडाही तितकाच गंभीर आहे. अशा परिस्थितीत निधन झालेल्या कोरोना रुग्णांवर अंत्यसंस्कार करतानाही रुग्णांच्या नातेवाईकांनाच आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. इस्लामपूर नगरपालिकेने कोरोना मृतांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी ठेका दिला आहे. या ठेकेदाराकडून अंत्यसंस्कार करण्यासाठी तब्बल ९ हजार रुपये आकारले जात आहेत. त्यामुळे मृत रुग्णांच्या नातेवाईकांची माणूस गमावल्यानंतरही परवड सुरू आहे.
येथील कापूसखेड नाक्यावरील स्मशानभूमीमध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांवर ठेकेदारांकडून अंत्यसंस्कार केले जातात. यासाठी पालिका प्रशासनाने हे काम ठेका पद्धतीने दिले आहे. एप्रिल महिन्यातच या ठेकेदाराने तब्बल ७४ हून अधिक मृतांवर अंत्यसंस्कार केले आहेत. एकीकडे कोरोनाची भीती सामान्यांच्या मनात धडकी भरविणारी ठरली आहे. त्यामुळे कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या निकटच्या नात्याजवळही जायला घाबरतात. तसेच वैद्यकीयदृष्ट्याही अशा मृतदेहाला हाताळण्याची परवानगीही प्रशासनाकडून दिली जात नाही. त्यामुळे अंत्यसंस्कार कोणी करायचे, हा प्रश्न उरला.
पालिका प्रशासनाने यावर पर्याय म्हणून एका खासगी व्यक्तीला पालिकेच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्याचा ठेका दिला आहे. या ठेकेदाराकडून कोरोनामुळे मृत पावलेल्या रुग्णाच्या नातेवाईकाकडून तब्बल ९ हजार रुपये घेतले जातात. त्यामुळे रुग्णालयातील उपचार करताना कंबरडे मोडलेले नातेवाईक त्यांच्यावर अंत्यसंस्कार करेपर्यंत आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे कोलमडून जात असल्याचे चित्र आहे. येथील स्मशानभूमीत वाळवा तालुका आणि सांगली जिल्ह्यासह बाहेर जिल्ह्यांतील मृतांवरही अंत्यसंस्कार केले जातात. त्यामुळे कोरोनामुळे दगावलेल्या रुग्णांवर अत्यल्प खर्चात अंत्यसंस्कार करण्याची व्यवस्था शासनाकडून झाली पाहिजे, अशी मागणी मृतांच्या नातेवाईकांकडून होत आहे.