तरुणांच्या आयुष्याशी एमपीएससीचा खेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:32 IST2021-07-07T04:32:00+5:302021-07-07T04:32:00+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : स्पर्धा परीक्षा देऊन अधिकारी पदाच्या खुर्चीत बसू पाहणाऱ्या तरुणांसाठी एमपीएससी म्हणजे चक्रव्यूह ठरत आहे. ...

तरुणांच्या आयुष्याशी एमपीएससीचा खेळ
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : स्पर्धा परीक्षा देऊन अधिकारी पदाच्या खुर्चीत बसू पाहणाऱ्या तरुणांसाठी एमपीएससी म्हणजे चक्रव्यूह ठरत आहे. उमेदीची पाच-सात वर्षे परीक्षेसाठी खर्ची घातल्यानंतरही यश न मिळाल्याने तरुणांचे मानसिक खच्चीकरण होते. हे तरुण मग कुटुंबासाठी ओझे ठरतात.
एमपीएससी व यूपीएससीसाठी मान मोडून रात्रंदिवस अभ्यास करणाऱ्या तरुणांची संख्या जिल्ह्यात मोठी आहे. सांगली, मिरज, इस्लामपूर, तासगाव, विटा आदी ठिकाणी त्यासाठीच्या अकादमीही सुरू आहेत. गेल्या काही वर्षांत एमपीएससीच्या परीक्षांचा गोंधळ सुरू असल्याने विद्यार्थी वैतागले आहेत. वयाची तिशी पार केल्यानंतरही नोकरी नाही आणि लग्नही नाही, अशा कोंडीत ते सापडले आहेत. अनेक पालकांनी उधार-उसनवार करून मुलांना पैसे पुरविले. पुण्यात राहून ते स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताहेत. गेले वर्षभर कोरोना व लॉकडाऊनमुळे परीक्षाही नाहीत आणि अभ्यासही नाही, अशी त्यांची कोंडी झाली आहे. काही तरुणांनी घरी परतून शेतीत लक्ष घातले आहे; पण स्पर्धा परीक्षेचे मोहजाल कायम आहे. वय निघून चालल्याने पालकही चिंतेत आहेत. काहींनी परीक्षा दिली आहे; पण निकाल नसल्याने चिंतेत आहेत.
बॉक्स
तरुणांना प्रतीक्षा परीक्षांच्या तारखांची
- एमपीएससीची मुख्य परीक्षा अद्याप व्हायची आहे. ती डिसेंबरमध्ये होण्याची अपेक्षा आहे.
- पोलीस उपनिरीक्षकपदाची परीक्षा दोन वर्षांपूर्वी झाली. निकालही जाहीर झाला; पण कोरोनामुळे प्रत्यक्ष मैदानावरील शारीरिक चाचण्या झालेल्या नाहीत.
बॉक्स
ऑनलाइन क्लासमधून तयारी कशी करायची?
१. लॉकडाऊनमुळे दीड वर्षापासून स्पर्धा परीक्षा अकादमी कुलूपबंद आहेत. परजिल्ह्यातील विद्यार्थी अभ्यास थांबल्याने गावाकडे निघून गेले आहेत.
२. लॉकडाऊन लांबल्याने शिक्षक व विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अभ्यास सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला; पण निरर्थक ठरत असल्याचा अनुभव आला.
३. काही क्लासचालकांनी अभ्यासाचे व्हिडिओ, यूट्यूब चॅनलद्वारे अभ्यासात सातत्य ठेवण्याचा प्रयत्न केला आहे, विद्यार्थीदेखील ऑनलाइन संपर्कात आहेत, पण असे किती दिवस चालायचे? हा प्रश्न आहे.
शासनाने एमपीएससीसाठी निश्चित धोरण ठरवावे
- स्पर्धा परीक्षांविषयी शासनाने ठोस धोरण निश्चित केले पाहिजे. लोकसेवा आयोगात सदस्य नसल्याने कामकाज ठप्प आहे. शेवटची परीक्षा मार्चमध्ये झाली. तिची पहिली उत्तरावली आली, पण दुसरी उत्तरावली आणि अंतिम निकाल अजूनही जाहीर झालेला नाही. मुख्य परीक्षाही अद्याप निश्चित नाही. हा खेळखंडोबा थांबला पाहिजे.
- प्रा. संजय सावळवाडे, सांगली, स्पर्धा परीक्षा शिक्षक
- विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील पाच ते आठ वर्षे स्पर्धा परीक्षेसाठी खर्ची पडतात. एखादी परीक्षा जाहीर होऊन निकाल लागणे आणि उत्तीर्णांना प्रत्यक्ष नियुक्त्या मिळणे यात सहा ते सात वर्षे जातात. शासनाने हा कालावधी एक ते दोन वर्षांचा केला पाहिजे. कर्ज काढून स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या तरुणांच्या आयुष्याशी शासनाने खेळ करू नये. विद्यार्थ्यांनीही बी प्लॅन तयार ठेवावा.
डॉ. विक्रम पाटील, इस्लामपूर, स्पर्धा परीक्षा शिक्षक
वय निघून चालले, संधीही संपल्या
गेल्या मार्च महिन्यात प्रथम परीक्षा दिली. तिची पहिली चाचणी उत्तरपत्रिका जाहीर झाली, पण दुसरी उत्तरपत्रिका व अंतिम निकालाची कोणतीही हालचाल नाही. मुख्य परीक्षेविषयीदेखील एमपीएससीने निर्णय घेतलेला नाही. शासनाने हा खेळखंडोबा थांबविला पाहिजे. वेळापत्रक निश्चित नसल्याने अभ्यासाची दिशाही ठरविता येत नाही.
- स्वप्नील गायकवाड, स्पर्धा परीक्षार्थी, सांगली
एमपीएससीच्या स्पर्धा परीक्षांची तयारी दोन वर्षांपासून करीत आहे. त्यावर लक्ष केंद्रित केल्याने रेल्वे किंवा अन्य परीक्षांकडे दुर्लक्ष करतो. एमपीएससीने व शासनाने धोरण निश्चित केल्यास आम्हाला धरसोड करावी लागणार नाही. अन्य परीक्षा देऊन चांगल्या नोकऱ्या मिळविता येतील. हा गोंधळ कधी थांबणार, याचीच चिंता आहे.
- रोहित कळेकर, स्पर्धा परीक्षार्थी, इस्लामपूर