जिल्ह्यात धनगर समाजाच्यावतीने आंदोलन

By Admin | Updated: July 28, 2014 23:25 IST2014-07-28T22:57:11+5:302014-07-28T23:25:18+5:30

आरक्षणाची मागणी : पद्माकर वळवी आणि मधुकरराव पिचड यांच्या भूमिकेचा निषेध, बुधवारी बंद पाळण्याचे आवाहन

Movement on behalf of Dhangar community in the district | जिल्ह्यात धनगर समाजाच्यावतीने आंदोलन

जिल्ह्यात धनगर समाजाच्यावतीने आंदोलन

सांगली : धनगर समाजास अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळावे, या मागणीसाठी जिल्ह्यात आज (सोमवार) ठिकठिकाणी ठिय्या आंदोलन करण्यात आले. त्याचप्रमाणे आरक्षणास विरोध केल्याबद्दल मंत्री पद्माकर वळवी व मधुकरराव पिचड यांचा समाजातर्फे निषेध करण्यात आला. आष्टा, कासेगाव येथे उद्या (बुधवारी) बंदचे आवाहन करण्यात आले आहे.
आष्टा : आष्टा (ता. वाळवा) येथील धनगर समाजाच्यावतीने सोमवारी बसस्थानकासमोरील संभाजी चौकात भरपावसात ठिय्या आंदोलन करण्यात आले. आरक्षणास विरोध करणाऱ्या मंत्री पद्माकर वळवी व मधुकर पिचड यांचा निषेध करण्यात आला. प्रमुख मार्गावरून निषेध फेरी काढण्यात आली. बुधवार, दि. ३0 रोजी बंदची हाक देण्यात आली आहे.
येथील धनगर गल्लीतील अहिल्या चौकात सकाळी सर्व युवक कार्यकर्ते एकत्र आले व त्यांनी प्रमुख मार्गावरून निषेध फेरी काढली. एस.टी. स्टॅण्डसमोरील संभाजी चौकात भर पावसात ठिय्या आंदोलन करण्यात आले. माजी उपनगराध्यक्ष बाबा सिध्द, सत्तू ढोले म्हणाले, प्रा. के. ए. माने, रामचंद्र सिध्द, बिरू बोते, वीर कुदळे, रघुनाथ बोते, कपिल बोते, पोपट भानुसे, विजय माने, गोविंद ढोले, पोपट शेळके, विजय भानुसे, कृष्णा गावडे, अण्णा फुलारे, बाबासाहेब ढोले, दीपक ढोले, सागर सिध्द, पांडुरंग ढोले, बाळासाहेब शेळके, बंडा टकले, गजानन शेळके उपस्थित होते.
कडेगाव : धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण लागू करण्यास विरोध केल्याबद्दल तालुक्यातील कार्यकर्त्यांनी आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड, पद्माकर वळवी, वसंत पुरके यांचा निषेध केला. तसेच राज्य शासनाने आरक्षण देण्याचा निर्णय घेतला नाही, तर बुधवार, दि. ३० रोजी तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे.
धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, समाजास अनुसूचित जमातीचे आरक्षण लागू करण्यासाठी आम्ही शासनाकडे मागणी करत आहोत. आरक्षण देण्यास आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड, पद्माकर वळवी, वसंत पुरके यांनी विरोध केला आहे. या सर्वांचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत. तसेच शासनाने दोन दिवसांत आरक्षण देण्याचा निर्णय घेतला नाही, तर बुधवार, दि. ३० रोजी तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे.
निवासी नायब तहसीलदार पी. एल. माने यांनी आंदोलकांचे निवेदन स्वीकारले. वांगीचे उपसरपंच राहुल होनमाने, विकास एडके, सचिन दार्इंगडे, आप्पा एडके, मंगेश वाघमोडे, पवन जानकर, उल्हास शिंदे, सुदाम होनमाने, भरत होनमाने, अभिजित कोळेकर उपस्थित होते.
इस्लामपूर : येथील जयमहाराष्ट्र विद्यार्थी सेनेच्यावतीने धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती लागू करू नयेत, असे सांगणाऱ्या मंत्र्यांच्या जाहीर निषेधाचे निवेदन नायब तहसीलदार अरुण निकम यांना विद्यार्थी सेनेचे संस्थापक चंद्रशेखर तांदळे यांनी दिले.
यावेळी सुरेश ताटे, राहुल जगताप, विकास वाघमोडे, दिनकर कोळेकर, सागर बंडगर, राहुल मगदूम, धीरज हुबाले, सचिन बंडगर, शिवाजी कोळेकर, उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Movement on behalf of Dhangar community in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.